सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा लाभलेले आणि मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून ६० व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्रीराम कृष्ण नानिवडेकर हे ठाण्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व!
जसे प्रत्येक शहरात सामाजिक बांधिलकी मानून निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतात, त्याचप्रकारे माणूसकीच्या नात्याने ठाण्यात समाजकार्याचा वसा श्रीराम नानिवडेकर यांनी जपला आहे. मूळचे मेकॅनिकल इंजिनिअर असलेले भाऊ घरच्या परंपरेप्रमाणे सामाजिक कार्यातही सहभागी झाले. २०/२५ वर्षे महाराष्ट्राबाहेर नोकरी करुन १९८४ सालापासून भाऊ ठाण्यातील गणेशवाडी भागात वास्तव्य करत आहेत.
भाऊंचे वडील महात्मा गांधींच्या आश्रमात ३ वर्षे राहून आलेले ! तसेच १९४२ साली स्वातंत्र चळवळीत त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. असा सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा घेऊन आलेले भाऊ, लहानपणापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आले आहेत. भाऊ स्वत: नेहमीच महाराष्ट्र मंडळ व इतर सामाजिक उपक्रमांत भाग घेत असत. अशा या भाऊंनी “आनंदवन स्नेही मंडळ” “विद्यादान सहाय्यक मंडळ” अशा सामाजिक संस्थांची स्थापना केली. ज्या संस्थांचं ठाण्यातील सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.
२००३ साली बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी काम करणारे “आनंदवन स्नेही मंडळ” त्यांनी स्थापन केलं. आज मंडळाचे सुमारे १०० कार्यकर्ते मुंबई व सर्व उपनगरांत कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे २००८ साली स्थापन केलेल्या “विद्यादान सहाय्यक मंडळा” द्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आज संस्थेने ७६ विद्यार्थी (आठवीपासून बी.ई. / एम्.बी.ए. पर्यंतचे) दत्तक घेतले असून त्यांच्यासाठी संस्थेने १०-११ लाख रुपयांचं अंदाजपत्रक केलं आहे. अशा या विविध सामाजिक उपक्रमातून भाऊंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
Leave a Reply