सुप्रसिध्द मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी बडोदा येथे झाला होता;खळे यांनी भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ संगीतमोहिनी घातली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर श्रीनिवास खळेंनी मुंबई गाठली. पण त्यांना काम मिळेना. ह्याच काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के.दत्ता म्हणजेच दत्ता कोरगावकर या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकरसाहेबांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेसाहेबांचे सगळे कष्ट वाया गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरूप बाहेर काढले. बर्याच हालअपेष्टांनंतर १९५२ साली त्यांची “गोरी गोरी पान” आणि “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील. ह्या दोन्ही रचना ग.दि. माडगूळकर ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या. पण ऐन वेळी हा चित्रपट मूळ निर्मात्याऐवजी दुसर्याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही. पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्हीकडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खर्या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले.
१ मे १९६० हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस.ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली होती. त्यापैकी एक म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत”. हे गीत शाहीर साबळे ह्यांनी गायले आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधली आहे. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला व शाहिरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीतालादेखील आहे. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे “महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान” हे गीतसुद्धा खूपच प्रचंड लोकप्रिय ठरले.
१९६८ सालापासून खळेंनी एचएमव्ही मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली. त्यानंतर त्यांनी १९७३ साली “अभंग तुकयाचे” हा संत तुकारामांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकरांकडून, तर अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. त्यानंतर लताबाई आणि भीमसेन जोशी यांच्या स्वरांत “रामश्याम गुणगान” या नावाने एक भक्तिगीतांची तबकडी काढली. श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, वीणा सहस्रबुद्धे, उल्हास कशाळकर अशा अनेक कलाकारांनी गायलेलेल्या गीतांच्या तबकड्या बनलेल्या आहेत.
भावगीतं, भक्तीगीतांव्यतिरिक्त “बोलकी बाहुली”,“जिव्हाळा”,“पोरकी”,“पळसाला पाने तीन”,“यंदा कर्तव्य आहे”,“सोबती”,“पळसाला पाने तीन” यासारख्या निवडक चित्रपटांना श्रीनिवास खळेंनी संगीत दिले होते. खळे यांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले आहे. त्याचे कारण म्हणजे तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नाही. भारंभार पैसे मिळताहेत म्हणून कोणतेही काम त्यांनी कधी स्वीकारले नाही. स्वत:च्या मनाला आनंद देईल अशाच चालींची त्यांनी निर्मिती केली. त्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावले.तसंच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित संगीत पाणिग्रहण ह्या संगीत नाटकाला श्रीनिवास खळेंनी संगीत दिले होते.
हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली अश्या विविध भाषांमध्ये गीतांना खळेंनी जरी संगीतबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे.
श्रीनिवास खळे यांनी संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना “लता मंगेशकर पुरस्कार”, “सूर सिंगार पुरस्कार”, “बालगंधर्व पुरस्कार”, “संगीत रत्न पुरस्कार”, “स्वररत्न पुरस्कार” व भारत सरकारचा मानाचा समजला जाणारा “पद्मभूषण” किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
२ सप्टेंबर २०११ या दिवशी वृध्दापकाळाने श्रीनिवास खळे यांचे ठाणे येथे निधन झाले.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका (2-May-2017)
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका (2-Sep-2017)
ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे (2-Sep-2021)
Leave a Reply