डॉ. श्रीराम लागू हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक आहेत. दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री त्यांच्या पत्नी आहेत.
अभिनेता हा चितनशील विचारवंत असला पाहिजे हे शंभू मित्रा यांचे मत डॉ. श्रीराम लागू यांना तंतोतंत लागू पडते. १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे त्यांचा जन्म झाला. एम. बी. बी. एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. पी. डी. ए., रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिदु, रुपवेध, आविष्कार, आय. एन. टी. आदि नाट्यसंस्थांच्या सुमारे पन्नास नाटकातून त्यांनी विविध भूमिका केल्या. वेड्याचे घर उन्हात, आधे आधुरे, गिधाडे, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, इथे ओशाळला मृत्यू, उद्ध्वस्त धर्मशाळा, सूर्य पाहिलेला माणूस, किरवंत, मित्र अशा नाटकातील एकाहून एक सरस भूमिका गाजल्या पण नटसम्राट मधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने ते खर्या अर्थाने नटसम्राट म्हणून गाजले. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात ‘गुरु महाराज गुरु’, ‘गिधाडे’, ‘हिमालयाची सावली’, ‘गार्बो’, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘कस्तुरीमृग’, ‘एकच प्याला’, ‘शतखंड’, ‘चाणाक्य विष्णुगुप्त’, ‘किरवंत’ इत्यादी. ‘कांती मडिया’ या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच ‘एक होती राणी’ आणि ‘ॲन्टीगनी’ या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. सामना, पिंजरा या सिनेमातील त्यांच्या भूमिका अजरामर झाल्या. हिदी चित्रपटात ही डॉक्टरांनी भूमिका केल्या. पण चित्रपटांपेक्षाही त्यांचे खरे प्रेम नाटकावरच होते. नाटक हे केवळ करमणुकीसाठी नाही ती एक गंभीर कला आहे असे त्यांचे आग्रही मत आहे. प्रामाणिक विचारांच्या डॉ. लागूंनी विचार स्वातंत्र्य आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी परखड भूमिका घेत विचारांबरोबर आचार ही तसाच ठेवला. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांन दिलेले योगदान विशेष आहे. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन करण्यात आला. तसेच शासनाने पद्मश्री हा किताब देऊन गौरविले.
डॉ. श्रीराम लागू यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू (27-Nov-2017)
रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू (10-Mar-2019)
नटसम्राट डॉ.श्रीराम लागू (16-Nov-2021)
## Dr. Shriram Lagu
Leave a Reply