सुलोचनाबाई

Sulochanabai

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्घ अभिनेत्री सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२९ या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील खडकलाट गावी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव रंगू. त्यांच्या आईचे नाव तानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरराव दिवाण होते. त्यांचे बालपण जन्मगावी खडकलाट येथे व्यतीत झाले. फौजदार असलेल्या शंकररावांनी सुलोचना दिदींच्या लहानपणापासून आवडी-निवडी जोपासल्या. गावातील तंबूमध्ये दाखविले जाणारे अनेक चित्रपट त्यांनी त्याकाळी पाहिले, आणि याच काळात त्यांच्या मनात अभिनयाचीब व कलेची आवड रुजली. लहानपणीच त्यांचे आईवडील निवर्तले व नंतर त्यांचा प्रतिपाळ त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केला. मास्टर विनायक यांनी आपल्या “प्रफुल्ल पिक्चर्स” या संस्थेत सुलोचना यांना सुरूवातीच्या म्हणजे १९४३ साली “ज्यूनियर आर्टिस्ट” म्हणून नोकरीस घेतले .१९४३ रोजी प्रदर्शित झालेल्या प्रफुल्ल पिक्चर्सच्या “चिमुकला संसार” या चित्रपटातून सुलोचनाजींनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी पहिल्यांदा छोटीशी भूमिका साकारली. त्यांची भाषा सुरुवातीच्या काळात ग्रामीण ढंगाची होती. त्यामुळे त्यांना बर्‍याचवेळेला टीका सहन करावी लागत असे. याच सुमारास त्यांचा परिचय लता मंगेशकर यांच्याशी झाला व त्यांनी सुलोचना दिदींना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.चे शिक्षण अवघं चौथीपर्यंतच झाले असले तरी सुलोचना दिदींनी चित्रपटसृष्टीत आपले नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे.

दरम्यानच्या काळात सुलोचनाबाईंचा परिचय कोल्हापूरमधील प्रभाकर स्टुडिओचे मालक आणि चित्रमकर्षी भालजी पेंढारकर यांच्याशी झाला. भालजींनीच त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण “सुलोचना” असे केले व हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. दिग्दर्शक भालजी पेंढारकरांना गुरुस्थानी मानून त्यांनी त्यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले. चित्रीकरणासाठी पुण्यात आल्यावर चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात त्यांनी भरपूर वाचन केले. नागरी भाषा आत्मसात करुन उच्चारशुद्घीसाठी संस्कृत श्लोकांचे पठण देखील केले.

१९४९ च्या सुमारास प्रदर्शित झालेल्या भालजींच्या “मीठभाकर” व “जिवाचा सखा” या चित्रपटांतील सुलोचनांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झाले.“वहिनीच्या बांगड्या” या चित्रपटातील त्यांची अविस्मरणीय भूमिका खूपच गाजली. त्यांची रुपेरी पडद्यावर सात्त्विक, सोज्वळ, वात्सल्याची प्रतिमा अशी ओळख निर्माण झाली व त्यामुळे त्यांच्या अभिनय-कारकीर्दीला नवे वळण लाभले. “स्त्री जन्मा ही तुझी कहाणी” या मराठीत गाजलेल्या चित्रपटावरुन हिंदीतील “औरत ये तेरी कहानी” या चित्रपटासाठीही त्यांचीच निवड केली गेली. हिंदी भाषेवर त्यांनी विलक्षण प्रभुत्व मिळविले.

त्यांना उपजत लाभलेले सोज्वळ सौंदर्य आणि अतिशय भावदर्शी चेहरा या बाबींमुळे त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या अप्रतिम भूमिका सादर करण्याची संधी मिळाली. प्रेमळ सोशीक आई, सालस बहीण, समजूतदार वहिनी या त्यांनी सादर केलेल्या व्यक्तिरेखा कसदार अभिनयासाठी वाखाणण्यात आल्या. शालीनता, सात्त्विकता व भूमिकेशी समरस होण्याची वृत्ती; अपार कष्ट करण्याची मानसिकता, अपयशाला सामोरे जाण्याचे धैर्य या त्यांच्या गुणवैशिट्यांमुळे त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटसृष्टीत अजरामर झाल्या आहेत.

सुलोचनाबाईंनी २५० पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा सादर केल्या. यामध्ये त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट म्हणजे “साधी माणसं”,“बाळा जो जो रे”,“दूध भात”,“मराठा तितुका मेळवावा”, “मोलकरीण”, “एकटी”, “वर्‍हाडी आणि वाजंत्री”, “प्रपंच”, “धाकटी जाऊ”, “स
ंगत्ये ऐका”, “आहेर”, “ओवाळणी”, “सुखाचे सोबती”, “भिंतीला कान असतात”;या मराठी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या व त्यांना राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. मराठीत सर्वाअधिक चित्रपटांतून त्यांनी नायिकेची भूमिका, तर उर्वरित चित्रपटांतून वहिनी, आई, सासू, अशा चरित्र-व्यक्तिरेखा साकारल्या.“भाऊबीज” या चित्रपटासाठी “चाळ माझ्या पायात” ही सुलोचना दिदींनी सादर केलेली लावणी आणि “मराठाति तुका मेळवावा” या चित्रपटासाठी त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भुमिका तर इतकी लक्षवेधी ठरली की प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या विषयी असलेले आदराचे स्थान अधिकच बळकट झाले.

अभिनेत्री सुलोचना यांनी सुमारे १५० हिंदी चित्रपटांमधुन चरित्र-अभिनेत्री सोबतच आईच्या भूमिका साकारुन त्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवल्या आहेत.“सुजाता” या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका खुपच लक्षणीय ठरली. त्याचशिवाय “झुला”,“नयी रोशनी”,“बंदिनी”,“मेरा घर मेरे बच्चे”,“कटी पतंग”,“मैं सुंदर हुं”,“जॉनी मेरा नाम”,“साजन”,“देवर”,“संघर्ष”,“अब दिल्ली दूर नही”“काला धंदा गोरे लोग”,“सरस्वतीचंद्र”, “आयी मिलन की बेला”,“आदमी”,“प्रेमनगर” चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या.१९४३ साली हिंदी चित्रपट सृष्टीत सहकलाकार म्हणून पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत अभिनयाची सुरुवात करून पुढे राजकपूर, शम्मीकपूर, शशीकपूर या कपूर घराण्याच्या दुसतर्‍या पिढीबरोबर व त्यानंतर, कपूर घराण्याच्या तियार्‍या पिढीतील रणधीर कपूर, ऋषी कपूर, गीता बाली, बबिता, नीतू सिंग यांच्या बरोबरही सहकलाकार म्हणून काम केले आहे.

मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवणार्‍या सुलोचनाजींना आज पर्यंत शेकडो पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. यामध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या महाराष्ट्र शासनाचा “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” महाराष्ट्र शासनाचा “व्ही. शांताराम पुरस्कार’, केंद्र सरकार तर्फे दिला जाणारा “पद्मश्री” किताबाने १९९९ साली तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा “चित्रभूषण पुरस्कारा”ने २००३ रोजी सन्मानित करण्यात आले आहे.

अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्या दीर्घ अभिनय कारकीर्दीविषयी लेखक-पत्रकार इसाक मुजावर यांनी लिहिलेले “चित्रमाऊली” हे पुस्तक नवचैतन्य प्रकाशनातर्फे सप्टेंबर २०१० साली प्रकाशित करण्यात आले आहे.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*