मूळच्या बंगालच्या असणार्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म, आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का येथे २८ जानेवारी १९३७ साली झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबध्द झाल्यावर त्या मुंबईत आल्या. सुमन कल्याणपूर यांनी शास्त्रीय संगीताचा अगदी कसून अभ्यास केला वडिल शंकरराव हेमाडी आणि आई सिताबाई यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संगीताचे सुरवातीचे धडे गिरवले.दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही सुमन कल्याणपुर यांना मिळत गेली.
सुमन कल्याणपूर यांचे सिनेसृष्टीतले आगमन गझलसम्राट तलत मेहमूद यांच्यामुळेच झाला. एका कार्यक्रमात सुगम संगीत गात असतांना तलत मेहमुद यांनी सुमनताईंचा आवाज ऐकला. ‘ईस लडकी के आवाज मे जादू है’ अशी त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी एच एम व्ही कडे स्वतःहून सुमन हेमाडी या नावाची शिफारस केली. सुमन कल्याणपूर यांच्या सोबतचे चित्रपटातले पहिले गाणे हे तलत महमूद यांचे होते. बंगाली, उरीया, पंजाबी, राजस्थानी, कानडी, भोजपूरी,गुजराती अश्या विविध भाषांमाध्ये गाणी गायली आहेत. गझल, ठुमरी, भक्तिगीते या गीतप्रकारांची सुमनताईंना अधिकच गोडी होती.
सुमन कल्याणपूर यांनी आजतागायत भावगीतांसोबतच,भक्तीगीते,गझल व चित्रपट गीते गायली आहे; त्यापैकी काही लोकप्रिय मराठी ठरलेली गाणी म्हणजे ‘रिमझिम झरते श्रावण धारा’, ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केशवा माधवा’, ‘ओमकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘या लाडक्या मुलानो’, ‘आई सारखे दैवत सार्या जगतात नाही’,’केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर’, ‘वाट इथे स्वप्नातील संपली जणु’, ‘अरे संसार संसार’, ‘असावे घर ते आपुले छान’, ‘आकाश पांघरून जग शांत झोपलेले’,’नाविका रे वार वाहे रे’, ‘या कळ्यांनो या फुलांनो’ (मंत्र वंदे मातरम), ‘कशी करू स्वागता’, ‘तुझ्या कांतीसम’, ‘कशी गवळण राधा बावरली’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’, ‘नकळत सारे घडले’, ‘शब्द शब्द जपुन ठेव’, ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’, ‘पहिलीच भेट झाले’, ‘पाखरा जा दुर देशी’, तर हिंदीत सुध्दा ‘ना तुम हमे जानो’, ‘दिल गमसे जल रहा’, ‘मेरे मेहबूब न जा’, ‘युं हि दिल ने चाहा था’ अशी लोकप्रिय गाणी त्यांनी गायिली. तसंच मोहम्मद रफी, मन्ना डे, तलत महमूद, हेमंतकुमार अश्या समकालीन गायकांबरोबर सुमनजींची अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
सुमन कल्याणपूर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०१० सालच्या राज्य शासनाच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्याशिवाय मोहम्मद रफी पुरस्कार, माणिक वर्मा पुरस्कार व झी मराठी वाहिनीच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.सुमन कल्याणपूर यांच्या जीवनचरित्रा वर आधारीत “सुमन सुगंध” हे आत्मचरित्र २००९ साली प्रकाशित झाले असून याचे लेखन सुप्रसिध्द निवेदिका मंगला खाडिलकर यांनी केले आहे.
Leave a Reply