सरदेशमुख, त्र्यंबक विनायक

Sardeshmukh, T.V.

साहित्यिक, कादंबरीकार, समीक्षक आणि कवी असलेल्या त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २२ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अक्कलकोट येथे झाले. त्यानंतरचे शिक्षण सोलापूर व नंतर पुणे येथे झाले. ज्योत्स्ना, वाङ्मयशोभा, धर्नुधारी इत्यादी मासिकातून त्यांनी सुरुवातीला लेखन केले. त्यानंतर ‘ससेमिरा’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. आपले काव्यलेखन त्यांनी ‘वैशाख’ या टोपणनावाने केले. ‘उत्तररात्र’ हा त्यांचा कवितासंग्रह १९५५ साली प्रसिद्ध झाला. पण सरदेशमुखांना खरी प्रसिद्धी मिळाली ती समीक्षक आणि कादंबरीकार म्हणून. ‘बखर एका राजाची’, ‘उच्छाद’, ‘डांगोरा एका नगरीचा’ या त्यांच्या तीन कादंबर्या गाजल्या. ‘अंधारयात्रा’, ‘गडकर्यांची संसार नाटके’, ‘प्रदेश साकल्याचा’, ‘रामदास ः प्रतिमा व प्रबोध’, ‘धुके आणि शिल्प’, ‘शारदीय’, ‘चंद्रकला’ इत्यादी समीक्षात्मक ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. साहित्याची निर्मिती, आकलन, स्वरूप आणि आस्वाद या संदर्भात सरदेशमुखांच्या स्वतःचे चितन त्यांनी या ग्रंथातील लेखातून मांडले आहेत. मानवी जीवनात असलेले शोकात्मता हे सरदेशमुखांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य आहे. बालकवी, केशवसुत, गोविदाग्रज आणि मर्ढेकर यांच्या कवितांचा वेध त्यांनी आपल्या ‘अंधारयात्रा’ या पुस्तकात घेतला आहे. तसेच गडकरी, ग्रेस, नारायण सुर्वे, शरदचंद्र मुत्ति*बोध, कुसुमाग्रज यांच्या काव्याबद्दल मूळगामी चर्चा सरदेशमुखांनी केली आहे. सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या दोन्हीचा आत्मप्रत्यय सरदेशमुखांच्या लिखाणातून आपल्याला दिसतो. त्यांच्या ‘डांगोरा एका नगरीचा’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. आणि थोड्याच दिवसात या ज्येष्ठ साहित्यिकाचे १२ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*