पाटील, संतोष

समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर समुदावर राहायचे व सकाळी शाळेला हजेरीही लावायची, असे खडतर आयुष्य जगणार्‍या उरणच्या संतोष पाटील या जलतरणपटूने नुकतीच जिब्राल्टरची खाडी पोहून पार करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा संतोष हा पहिलाच ‘नौसैनिक’.

उरणच्या केगाव-दांडा या ग्रामीण भागात राहणार्‍या संतोषच्या पोहण्याच्या आवडीला एका ध्येयाचे रूप मिळाले ते सेंट मेरी आणि ‘नेटिव्ह स्कूल ऑफ उरण’ या शाळांमध्ये. शाळेत संतोषने जिल्हा, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत आपले भन्नाट वेगात पोहण्याचे कौशल्य दाखवले आणि वयाच्या १६व्या वर्षी धरमतर ते मुंबई हे अंतर ९ तास १६ मिनिटांत पार केले.
[…]