कानेटकर, वसंत

Kanetkar, Vasant

कानेटकर, वसंत

 महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे दर्जेदार नाटकांचे लेखक वसंतराव कानेटकर. फक्त नाटककार नाही तर कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन करणारे वसंतराव कानेटकर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व. कानेटकरांचा जन्म २० मार्च १९२२ चा. त्यांचे माध्यमिक व उच्चशिक्षण पुणे व सांगली येथे झाले. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात (एचपीटी) सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान, शिकविण्याची उत्कृष्ट हातोटी त्यामुळे विद्यार्थीप्रिय अशा कानेटकर सरांच्या वर्गात ज्यांचा तो विषय नाही असे विद्यार्थी सुद्धा त्यांचे लेक्चर ऐकायला त्या वर्गात बसत असत. अशा आठवणी आजही सरांबद्दल सांगितल्या जातात. २५ वर्षे अध्यापन केल्यानंतर नाट्यलेखनासाठी सरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. कवी गिरीश हे कानेटकर सरांचे वडील. त्यामुळे घरातील काव्य आणि साहित्याच्या भारावलेल्या वातावरणात त्यांच्या पिडाची जडणघडण झाली. याशिवाय वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला.

नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी ‘जन्माचे गुलाम’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९५० मध्ये ‘घर’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर ‘पंख’, ‘पोरका’, ‘तेथे चल राणी’अशा लिखित, अनुवादित कादंबर्‍या प्रसिद्ध झाल्या. नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकृतीच्या लिखाणाने त्यांच्या कादंबरीने मराठी कादंबरीला एका वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचा ‘लावण्यमयी’ हा कथासंग्रह ही ख पच गाजला. त्यानंतर सरांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला आणि ते त्या क्षेत्रात सर्वेसर्वा झाले. ३० वर्षांच्या काळात त्यांनी सुमारे चाळीस नाटकं आणि काही एकांकिका रंगभूमीच्या ओटीत घातल्या. प्रेक्षकांची आवडनिवड जाणणारा एक प्रयोगशील नाटककार म्हणून ते लोकप्रिय होते.

‘वेड्याचं घर उन्हात’ हे त्यांचे पहिले नाटक म्हणजे मनोविश्लेषणाचा एक नवीन प्रयोग होता. त्यानंतर ‘देवांचं मनोराज्य’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘मत्स्यगंधा’, ‘हिमालयाची सावली’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘कस्तुरीमृग’,‘वादळ माणसाळतयं’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘मला काही सांगायचयं’ इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. नुसती लिहिली असं नाही तर प्रत्येक नाटकात सरांनी वेगवेगळे प्रयोग हाताळले होते. नाटकातलं कथानक बीज समाजातील विषयांवर असले तरी सामान्य कक्षा ओलांडून विषय, आशय, आविष्कार आणि भाषा या सर्व माध्यमातून सरांची नाट्यलेखनावर उत्कृष्ट पकड असे. त्यांनी लिहिलेल्या संवादात भावनेचे मर्म, उत्कटता आणि भाषेची लवचिकता ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवत. मराठी रंगभूमीला स्थैर्य देणार्या ठरावीक नाटककारांमध्ये कानेटकर सरांचे नाव अग्रेसर समजले जाते. १९८८ मध्ये ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला होता. त्यांच्या शेवटच्या काळात ते लिहित असलेली काही नाटके अपुरी राहिली. ३० जानेवारी २००१ रोजी त्यांना नाशिक येथे देवाज्ञा झाली.

वसंतराव कानेटकर यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर (21-Mar-2017)

मराठीतील दर्जेदार नाटकांचे लेखक वसंत कानेटकर (31-Jan-2019)

1 Comment on कानेटकर, वसंत

Leave a Reply

Your email address will not be published.


*