रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते.
माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्यात वास्तव्यास आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले.
त्याचवेळी फडके क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे महत्त्व फडक्यांना पटवून देऊन मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करणे महत्त्वाचे असल्याचेही फडक्यांना सांगून दिले.
अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.
१८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तिथल्या लोकांना मदत करून आणि त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
यानंतर नफडक्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली.
रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण निवडले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देउन आपल्या ”सैन्यात” भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांसाठी शहरावर कब्जा मिळवला.
एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालिला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितूरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणार्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले!
या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकार्याने फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.
२० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने वासुदेव बळवंत फडक्यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी फडक्यांना परत अटक करुन पुन्हा तुरुंगात टाकले.
पण तिथे आपल्याला मिळत असलेल्या अमानुष वागणूकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले. याच अवस्थेत १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचा मृत्यू आला.
Leave a Reply