आपटे, विनय

आपटे, विनय

अभिनेते विनय आपटेंचा जन्म १७ जून १९५१ साली झाला. विद्यार्थी दशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले ते विजय बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली. राज्य नाट्य स्पर्धेत विनयजींनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अ‍ॅव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला.

१९७४ साली दूरदर्शनचा माध्यामातून कार्यकारी निर्माता म्हणून अनेक वर्ष नाट्य विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’ सारख्या अनेक लोकप्रिय कार्यक्रमांचीही निर्मिती केली. विशेष म्हणजे ‘डेलीसोप’ चा ट्रेंड रुजवण्याचा बहुमान देखील विनय आपटेंना जातो; अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन विनयजींनी केले यामध्ये, ‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ‘शुभ बोले तो नारायण’ ही त्यांनी काम केलेली काही नाटके खुप गाजली होती; ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. विजय तेंडुलकरांनी लिहलेल्या ‘मित्राची गोष्ट’ यासह ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या असंख्य नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. चित्रपट, रंगभूमी, आकाशवाणी किंवा दूरचित्रवाणी माध्यम प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा आणि ओळख विनय आपटेंनी निर्माण केली. मराठी कलाक्षेत्रातील भारदस्त आवाज असं समीकरण त्यांच्याशी जोडलं गेलं होतं. ‘गणरंग’ या नाटय़संस्थेचे संस्थापक होते; मराठी चित्रपटांमध्ये विनय आपटेंनी “फॉरेनची पाटलीण” , “खबरदार”, तर “सत्याग्रह”, “आरक्षण”, “धमाल”,”इट्स ब्रेकिंग न्यूज”, “चांदनी बार”, “एक चाळीस की लास्ट लोकल”,” ट्रॅफीक सिग्नल” अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. याशिवाय ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘दुर्वा’, ‘वहिनीसाहेब’ ‘दुनियादारी’, यासारख्या मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका सुध्दा साकारल्या. आजचे आघाडीचे कलाकार महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सुकन्या कुलकर्णी, सुनील बर्वे, अतुल परचुरे, श्रीरंग गोडबोले यांना पहिल्यांदा ब्रेक देण्याचे काम विनय आपटेंनी केले.

७ डिसेंबर २०१३ रोजी छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे विनय आपटे यांना अंधेरी येथील कोकिलाबेन अंबाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच रात्री त्यांचं निधन झालं; मृत्यु समयी ते ६२ वर्षांचे होते.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे (22-Jun-2018)

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे (7-Dec-2017)

विनय आपटे (29-Oct-2019)

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे (17-Jun-2019)

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे (7-Dec-2021)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*