गुप्ते, विनया

लग्नाच्या आधी आईने प्रेमाने निव्वळ छंद म्हणून शिकवलेल्या कला व कौशल्ये, लग्नानंतर एक कौटुंबिक गरज म्हणून अर्थार्जनासाठी कशा उपयोगी पडू शकतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे विनया गुप्ते यांचा व्यवसाय आहे. १९९१ साली कल्याण मध्ये घरगुती स्वरुपात सुरू झालेला ब्युटी पार्लरच्या व्यवसायाचा विस्तार आजमितीस अतिप्रशस्त “शगुन इन्स्टिटयूट ऑफ ब्यूटी कल्चर आणि फॅशन डिझायनिंग”मध्ये रुपांतर करण्याची किमया उद्योजिका विनया गुप्ते यांनी केली आहे. स्वतःच घर प्रचंड आत्मविश्वासाने व जिद्दीने उभे करत असतानाच हजारो निराधार महिलांना रोजगार व स्वयंसिध्दतेच्या मार्गांनी आपापल्या आयुष्यांना रेखीव आकार देण्यास शिकविणार्‍या विनया गुप्ते आज महिला सक्षमीकरणाच्या कॉर्पोरेट चेहरा बनल्या आहेत. त्यांच्या या व्यवसायाचं विस्तारीकरण करताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचं नवं पर्व कल्याणमध्ये उभं केलं आहे.

शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणार्‍या सुवर्ण जयंती शहरी योजनांसाठी कल्याण, मिरा-भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, माथेरान, खोपोली या भागांतील नगरपालिका व पालिकांमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबीरे व चर्चासत्रे आयोजित करुन ब्युटी पार्लर, शिवणकाम, ज्वेलरी मेकिंग, डॉल मेकिंग, स्नॅक्स, चॉकलेट मेकिंग, बॅग मेकिंग, एम्ब्रॉडरी, स्टाफ टॉईज मेकिंग अशा अनेक लहान-मोठ्या उद्योगांसाठी महिलांना प्रशिक्षण त्यांनी आजतागायत दिले आहे.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*