आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा गौरव केला जातो. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राची आणि मराठीची अस्मिता आयुष्यभर जोपासली.
राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, शिक्षण आणि साहित्य यांसारख्या विविध क्षेत्रांतून कर्तबगारीने आणि सातत्याच्या संचाराने यशवंतराव चव्हाणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. संयुक्य महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांनी एक सुसंस्कृत अन् पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा देशभर उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला.
सत्तेचे विकेंद्रीकरण करुन लोकशाहीची मुळे गावपातळीवर रुजवणारी “पंचायत राज” व्यवस्था त्यांच्याच कारकिर्दीत महाराष्ट्रात सुरु झाली.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात राज्यात १८ सहकारी साखर कारखाने सुरू झाले. “कसेल त्याची जमीन” असा कायदा करुन त्यांनी कष्टकर्यांना दिलासा दिला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ठरलेला कोयना जलविद्युत प्रकल्प त्यांच्याच दूरदर्शी नेतृत्वाची देण आहे. आज वटवृक्षात रुपांतरित झालेल्या उद्योग क्षेत्राचे रोपटे त्यांनीच सिंचित केले आहे. साहित्य संस्कृती मंडळाची निर्मिती करुन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितात भर घालण्याचेच काम त्यांनी केले. अवघ्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी घातलेल्या पायावरच आज राज्याच्या विकासाची इमारत उभी आहे.इंग्रजी चौथीचा वर्ग. जाणिवेचे आकलन नुकतेच व्हायला लागले होते.
आयुष्यातील आकांक्षा, महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले होते. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘तू कोण होणार रे ?’’ प्रत्येक विद्यार्थी उठून उत्तर देत होता. कोणी सांगितलं, ‘‘टिळक’’ कोणी ‘‘डॉक्टर’’ तर कोणी ‘‘कवी’’ पण त्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘मी यशवंतराव होणार !’’आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची जाणीव इतक्या लहान वयात ज्यांना झाली होती ते यशवंतराव चव्हाण !
यशवंतराव चव्हाणांचा जन्म १२ मार्च १९१४ साली देवराष्ट्र या गावी झाला. देवराष्ट्र हे त्यांचे आजोळ ! सातारा जिल्ह्यातील विटे हे त्यांचे मूळ गाव. सामान्य शेतकर्याप्रमाणे वडिलांची परिस्थिती. वडिलांच्या बदलीच्या कारणामुळे ते कर्हाडला आले. पण प्लेगच्या साथीत वडिलांचे छत्र हरपले आणि यशवंतराव देवराष्ट्रास मामाकडे आले. तिथे त्यांचे चवथी पर्यंत शिक्षण झाले. पुढे ते कर्हाडच्या शाळेत दाखल झाले. ओढग्रस्त अवस्थेतच त्यांच शिक्षण सुरू होतं.
मॅट्रिकच्या परीक्षे नंतर कोल्हापूरच्या महाविद्यालयातून ते इतिहास आणि अर्थशास्त्र घेऊन ते बी. ए. झाले व नंतर पुणे येथे येऊन तेथून एल्. एल्. बी. पदवी मिळविली. त्यानंतर मात्र त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राजकीय कार्याकरितां वाहून घेतले.
त्याकाळी सातारा जिल्ह्यात गाजलेल्या कुपरशाहीला विरोध करणारा, समाजवादाची प्रेरणा व ध्येयवाद असलेला, पुरोगामी विचाराचा गट यशवंतरावांनी काँग्रेसमध्ये उभा केला आणि कुपरशाहीला विरोध केला. पुढे १९३२ सालच्या चळवळीत त्यांना १८ महिन्यांची सक्षम कारावासाची शिक्षा ही झाली. त्यानंतर त्यांनी कराड, वडूज, पाटण, तासगाव येथील लोकांना मार्गदर्शन सुरूच ठेवले होते. त्यात त्यांच्यावर भूमिगत रहाण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर १०००/- रु. चे बक्षीस ठेवले होते पण जनतेचा त्यांना भरघोस पाठिबा होता.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५२ सालच्या निवडणुकीत जीवाचे रान करून आपल्या वक्तृत्वाने बहुसंख्य जनतेचा काँग्रेसला पाठिबा मिळवून दिला. मोरारजीभाईंच्या मंत्रीमंडळात ते पुरावठा मंत्री म्हणून काम बघत पण संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांची नियुक्ती झाली. पुढे त्यांचा प्रवेश दिल्लीच्या राजकारणात झाल्यावर उपपंतप्रधान पद त्यांनी भूषविले.
राजकारण किवा समाजकारणाच्या व्यतिरिक्त यशवंतराव एक उत्कृष्ट वक्ता होते तसेच ते साहित्यिकही होते. यशवंतरावांचे वाचनही सर्वांगी होते त्यामुळे फक्त राजकीय नेता अशी प्रतिमा न राहता एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उच्च अभिरूची संपन्न व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा लोकांच्या मनात आजही आहे. दि. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.
## Yashwantrao Chavan
Leave a Reply