घरातील जेवण असो किंवा लग्नाच्या पंगती, जेवल्यानंतर बडीशेपची पुडी, घरात डब्यात भाजून ठेवलेली बडीशेपची थाळी आगत्याने पुढे केली जाते. मुखशुद्धी व पचनासाठी अत्यंत उपयोगी बडीशेप औषधी म्हणूनही विविध काढे आणि ‘ग्रीन टी’सारख्या चहामध्येही वापरली जाते. विविध रंगांच्या बडीशेपच्या गोळ्या मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानमध्ये वापरल्या जातात. आपल्याला जी हिरव्या रंगाची बडीशेप दिसते ती फिनिक्युलम व्हल्गेर या वनस्पतीचं सुकलेलं पक्व बी असतं. याचबरोबर मसाले पानात हमखास असणारा पदार्थ म्हणून बडीशेपकडे पाहिले जाते. बडीशेपचे झाड कोरड्या वाळूरहित मातीमध्ये समुद्र किंवा मोठ्या नदीपात्राजवळ उत्तमरीत्या उगवते. बडीशेपच्या झाडाचा बुंधा हा फुगीर असून, काही भागांमध्ये त्याची भाजी करूनही खाल्ली जाते. बडीशेपची झाडे साधारण अडीच मीटर इतक्या उंचीपर्यंत वाढतात. झाडाला देखील विशिष्ट वास असतो. बडीशेपची पाने-फुले काही ठिकाणी भाजी करून, तर काही ठिकाणी कच्च्या स्वरूपात खाल्ली जातात.
जगभरात अर्जेटिना, लेबनन, जर्मनी, ब्राझिल, फ्रान्स, इटली, चीन, डेन्मार्क या देशांत तर भारतात महाराष्ट्र, पंजाब, आसाम आणि गुजरात आदी ठिकाणी हिची लागवड होते. यात फिंकोन नावाचा स्वादकारक घटक असतो. बी लहान, पिवळट हिरव्या आणि करडय़ा रंगांचं असून त्यावर रेषा असतात. त्याला काहीसा गोड वास असतो. लोणची, बेकरी पदार्थात, मसाल्यात आणि औषधांमध्येही त्याचा वापर केला जातो. मुखशुद्धीसाठी ती जेवणानंतर खाल्ली जाते. हे झाड साधारण पाच फूट उंचीपर्यंत वाढतं. पानं बारीक आणि चविष्ट असतात. या झाडाची पानं कोथिंबिरीप्रमाणे दिसतात. फुलं पांढ-या आणि पिवळसर रंगांची असून आकारानं लहानच असतात. झाडाच्या तु-याला बडीशेपेचे दाणे किंवा फळं येतात. बडीशेपचा वापर खऱ्या अर्थाने १९व्या शतकात मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला. युरोप, कॅनडा, अमेरिका, आशिया, येथे बडीशेपपासून मद्यनिर्मिती केली जाते. बडीशेप उत्पादनात भारत राजा आहे. अमेरिकेमध्ये रानटी बडीशेपच्या बारीक फुलांचा वापर पारंपरिक खाद्य संस्कृतीमध्ये केला जातो. या फुलांना महत्त्व तर आहेच; पण त्यांचा समावेश मसाल्यामध्ये किंवा मसाल्याचा एक प्रकार म्हणून केला जातो. सुकलेली बडीशेप जी हिरव्या आणि तपकिरी रंगामध्ये आढळते. जसजशी बडीशेप जुनी व अधिक सुकत जाते, तसा तिचा रंग फिकट होत जातो. जेवणात वापरण्याकरिता हिरवट रंगाच्या बडीशेपचा वापर केला जातो. बडीशेपचे कंद ही पातीच्या कांद्याप्रमाणे दिसतात. कोवळी असल्याने व मंद सुवासामुळे त्यांचा वापर विविध ठिकाणी केला जातो. बडीशेपचा वापर आता मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने सॉस, टूथपेस्ट, सूप्स, आदींमध्ये केला जात आहे. भारत व पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान या देशांत पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये बडीशेपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात काश्मिरी व गुजराथी पदार्थांमध्ये बडीशेप महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. आसाम, बंगाल, ओडिशा येथे पाच विविध मसाले महत्त्वाचे मानले जातात. त्याला ‘पंच पोहरण’ म्हटले जाते. त्यात बडीशेप असते. भारतात बडीशेप भाजून जेवणानंतर खाण्यास मुखवास म्हणून घेतली जाते. बडीशेपचा वापर बऱ्याच मांसाहारी तसेच शाकाहारी जेवणांमध्ये आवर्जून केला जातो. सध्या हर्बल टीचे खूप फॅड आहे. त्यातही बडीशेप वापरली जाते. जेवण रुचकर होण्यासाठी मसाल्यांचा वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये बडीशेपचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि गोवा, कारवार या ठिकाणी माशांच्या कालवणाच्या जेवणात बडीशेप हमखास वापरली जाते. खाऊच्या साध्या व मसाले पानांत बडीशेप वापरली जाते. कोल्हापुरात लखनवी आणि साधी अशा दोन प्रकारांत बडीशेप विक्रीसाठी येते.
बडीशेपमध्ये एनिथॉल नावाचा घटक असतो, ज्यामुळे तिला औषधी स्वरूप प्राप्त झाले आहे. मानव व प्राण्यांच्या शरीरात गॅसवातचा त्रास झाला तर बडीशेप गुणकारी मानली जाते. ग्राईप वॉटर, खोकल्याची आयुर्वेदिक औषधे यांच्यात बडीशेप हमखास असते; तर उत्तम दृष्टीसाठी बडीशेपच्या मुळाचा वापर करून काढण्यात आलेला काढा वापरला जातो. रक्तदाबावरही औषधी म्हणून बडीशेपचा वापर औषधी कंपन्या आपल्या उत्पादनात करतात. तसेच माश्या व कीटकांच्या नियंत्रणासाठीही बडीशेपचा वापर केला जातो.
बडीशोप ही भूक वाढवणारी असून अन्नपचन नीट घडवण्यास मदत करते. मूत्रप्रवृत्ती वाढवणारी आहे. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करते. पोटदुखी, पोटातील वात, पित्त, अजीर्ण यावर अतिशय गुणकारी असते. मासिक पाळीच्या विकारावरही उपयुक्त ठरते. छातीतील जळजळ कमी होते. हृदयरोगाला आळा बसवते. अस्थमा, कफ यासारख्या विकारांवर उपयुक्त ठरते. रक्तदाब नियंत्रित ठेवते. शरीरात वाढलेलं चरबीचं प्रमाण कमी करण्यास मदत करते. बडीशेप तेलानं मसाज केल्याने सांधेदुखी कमी होते. दररोज सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. मधुमेहींनी बडीशेप भाजून तिची पूड करून रोज सकाळी कोमट पाण्यातून घेतली तर आराम पडतो. अर्धा कप पाण्यात सहा चमचे बडीशेप घालावी. त्याचबरोबरीने त्यात गुलाब पाकळ्या घालाव्यात. हे मिश्रण उकळून गाळून घ्यावं, असं दिवसातून दोनदा घेतल्यानं अॅनिमियासारखे आजार आपसूक कमी होतात. एक लिटर पाण्यात पन्नास ग्रॅम बडीशेप घालून उकळवा. मिश्रण थंड झालं की गाळून ते पाणी कपाळावर दिवसांतून तीन वेळा लावल्याने मायग्रेनचा त्रास कमी होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुखवास तयार करणेची पद्धत सांगा