धान्यफराळ म्हणून भाजलेल्या धान्याचे पदार्थ केले जातात. अशा वेळी या भाजणीचा उपयोग करता येतो. ही भाजणी वापरून खमंग पदार्थ तयार करता येतात.
भाजणी
भाजणी साहित्य : अर्धा किलो हरभराडाळ, अर्धा किलो ज्वारी, एक वाटी बाजरी, एक वाटी तांदूळ, एक वाटी उडीदडाळ, अर्धी वाटी गहू, एक वाटी नाचणी, एक वाटी जाड पोहे, अर्धी वाटी धने, दोन चमचे मेथी दाणे.
सर्व धान्य वेगवेगळे खमंग भाजावे. पोहे थोडेसे गरम करावेत. धने, मेथीदाणे खमंग भाजून सर्व एकत्र मिसळावे. जाडसर दळून आणावे. ही भाजणी सहा महिने चांगली राहते. लागेल तशी वापरता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजणीचे वडे
साहित्य : दोन वाट्या भाजणी, 15-20 लसूण पाकळ्या, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक चमचा लाल तिखट, एक चमचा पांढरे तीळ, दोन चमचे लोणी, कोथिंबीर, मीठ, तेल.
कृती : भाजणी परातीत घेऊन त्यात लोणी, मीठ घालून चांगले मिसळावे. लाल तिखट, वाटलेली लसूण-हिरवी मिरची, कोथिंबीर घालावी. सर्व पदार्थांसह पीठ एकजीव करावे. दोन वाट्या पाणी कोमट करावे. पाणी लागेल तसे घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट भिजवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. पीठ चांगले मळून घ्यावे. तेलाचा हात लावून वडे थापून ठेवावेत. वड्यांवर वरून तीळ दाबून बसवावेत. रिफाइंड तेलात वडे खमंग, लालसर तळून काढावेत, टोमॅटो सॉस अगर दह्यात कालवलेली दाण्याची चटणी बरोबर द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मोकळी भाजणी
साहित्य : तीन वाट्या भाजणी, एक कांदा, एक टोमॅटो, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धने-जिरेपूड, हिंग, मीठ, कोथिंबीर, कढीलिंब पाने, नारळचव, तेल.
कृती : बाऊलमध्ये तीन वाट्या पाणी घेऊन भाजणी पीठ कालवून ठेवावे. गुठळी मोडावी. भाजणीत तिखट, मीठ, हिंगपूड, धने-जिरे पूड घालावी. कढईत थोडे जास्त तेल घालून मोहरी, जिरे, कढीलिंब, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत कांदा घालावा. कांदा लालसर झाला की कालवलेली भाजणी घालावी. मंद गॅसवर परतावे. पीठ कोरडे होईपर्यंत सारखे परतत राहावे. वरून थोडे थोडे तेल सोडावे, म्हणजे भाजणी मोकळी होते. मोकळी भाजणी बाऊलमध्ये काढावी. वरून टोमॅटो फोडी, नारळचव, कोथिंबिरीने बाऊल सजवावा. गरम खावी. सोबत कैरीचे लोणचे द्यावे. छान लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply