केळफूल हे स्निग्ध, मधुर, तुरट, गुरू, कडसर, अग्निप्रदीपक, वातनाशक तसेच काही प्रमाणात उष्ण आहे. रक्तपित्त, कृमी, क्षय, कोड यावर ते गुणकारी आहे. आपल्या आहारात या केळफुलांचा वापर नक्कीच करू शकतो. बनाना फ्लॉवर म्हणजेच केळफूल आणून त्याची भाजी केली जाते. योग्य केळफूल निवडून चिरणे जरा किचकट व चिकित्सक काम आहे. परंतु, त्याचे पौष्टिक गुणधर्म जास्त महत्त्वाचे आहेत.
केळीचे रोप जेव्हा मोठे होते, तेव्हा त्याच्या मध्यभागातून एक दांडा फुटतो. या दांड्याच्या अग्रभागी लाल रंगाची फुले येतात व त्यांचे रूपांतर केळीत होते. केळ्याच्या एका घडात 300 ते 400 केळी तयार होतात. चंपाकदली, अमृतकदली, मर्त्यकदली, माणिक्यर कदली, लोटण, वेलची केळी, चंपाचिनी इत्यादी केळीच्या मुख्य जाती आढळतात. याशिवाय रंगभेदावरूनही केळीच्या जाती ठरतात.
केळफुलाचा उपयोग भाजी, कोशिंबिरीमध्ये, वाफवून किंवा कच्च्या स्वरूपातही खाल्ले जाते. केळफूल निवडताना ताजे, फॉर्म स्वरूपाचे निवडावे. केळफूल सोलताना हाताला तेल लावावे म्हणजे चिकटपणा व डाग राहत नाहीत. मोठ्या केळफुलांत लहान लहान फुलांच्या फण्या असतात. पूर्ण स्वरूपात या लहान फुलांचा वापर केला जातो. केळफुलाच्या बाहेरील जाड पाने काढून टाकतात. आतील लहान फुलांच्या फण्या बाहेर काढतात. प्रत्येक लहान फुलातील कडक दांडा व त्याच्या खालच्या बाजूला असलेला पांढरा पारदर्शक टोपीसारखा भाग काढून टाकतात; तो चिरला जात नाही व शिजत नाही. बाकी भाग स्वच्छ धुऊन चिरून घेतात.
केळफुलातील गुणधर्मामुळे रक्त शुद्ध होते. केळफुलामुळे रक्तातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. म्हणून ऍनिमियामध्ये उपयुक्त. इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोमसारख्या आजारात केळफूल उपयुक्त असते.
केळफुलामुळे प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये रक्तस्रावाचा जास्त त्रास होत नाही. जास्त रक्तस्राव होत असेल, तर केळफुले शिजवून दह्याबरोबर खाण्याचा सल्ला दिला जातो. केळफुलात जीवनसत्त्व “क,’ “अ,’ “ब,’ “के’ फॉस्फरस कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. ब्रॉन्कायटिस व पेप्टिक अल्सरमध्ये केळफूल उपयोगी पडते. स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये दूधनिर्मितीसाठी उपयोगी. चवीत बदल म्हणूनही केळफूल खावे. भरपूर तंतुयुक्त असल्याने मधुमेही लोकांनी केळफूल जरूर खावे. त्यामुळे पोटही भरते, चवीत बदल होतो व साखर लगेच वाढत नाही. आतड्यांचा, स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आहारात केळफूल घ्यावे.
केळफुलाचा केशरयुक्त भाग कापून त्यात मिरपूड भरून ठेवावी व सकाळी ते केळफूल तुपात तळून खावे. त्याने श्वानसविकार लवकर बरा होतो, असे वर्णन आयुर्वेदात केले आहे. सर्व वयोगटांसाठी केळफूल खाणे उत्तम. बलवृद्धीसाठी उपयुक्त.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
केळफुलाची भाजी करताना
केळफुलाची भाजी करताना केळफुलातील पुकेसर वेगळा काढून टाकावा. (फुलाच्या आजुबाजुचा फोलपटासारखा भाग व आतील जाडसर कावळा(केसर) काढून टाकावा.) केळ्फुल सोलून बारीक चिरावे. सोलताना हाताला थोडे तेल लावलं तर हात काळे होणार नाहीत. चिरताना सुरीला आणि हातालाही तेलाचे बोट लावा म्हणजे राप चढणार नाही. केळफूल चिरताना तुकडे आंबट ताकात टाकले तर त्यांचा रंग काळा पडत नाही. ( रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले तर त्यातील चीक निघून जाईल.)
केळफुलाच्या भाजीत काही जण डाळिंब्या, काळे वाटाणे, मुगाची डाळ पण घालतात.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply