पिठलं वाटीबीटीत वाढणं आणि ते चमच्याने खाणं हा पिठल्याचा महान अपमान आहे. त्याची जागा पानात उजवीकडेच. पिठलं म्हटलं की चण्याचं पण बदल म्हणून कुळथाचे हा अतिशय उत्तम पर्याय, कधी केलं तर तसं सांगायचं. अगदी रोज खाऊन ही त्याचा कंटाळा येत नाही . ह्या पिठलं प्रेमावरुनच ” पिठलं… आणि तोंड मिटलं अशी मुळी म्हणच तयार झाली आहे. घरात काही महाभाग असतात पानात पिठल्याचा थेंब ही पाडुन न घेणारे. पण ते किती?, अपवादाने नियम सिद्थ होतो म्हणण्या इतपतच. घरात कोणी सर्दी पडशाने बेजार झाले की जेवताना म्हणतात ,“ पिठलं वाढ ग थोडं, तोंडाला रुची येईल जरा ” नवीन सुना घरात रुळायच्या ही आधी पिठलं आवडीने खायला लागतात. शिक्षणासाठी बाहेर रहाणारी मुलं घरी आली की “आई, पिठलं वाढ, किती दिवस झाले खाल्लं नाहीये ” असं म्हणतात. दोन वर्षाचं घरातलं छोटं बाळ वरणभाताला तोंड फिरवत आणि भात पिठलं मिटक्या मारत खात. या सगळयामुळे पिठलं प्रेमाची ही परंपरा जो पर्यंत मराठी पदार्थ आहेत तो पर्यंत चालू राहणार हे नक्की.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अजून काही कृती पिठल्याची
काकडीचं पिठलं
साहीत्य:- लहान आकाराच्या दोन काकड्या, लसूणाच्या चार पाकळ्या, दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, मोहरी, गोडनिंबाची चार पानं, मीठ, तिखट, हळद, हिंग, बेसन.
कृती:-काकड्या सोलून किसून घ्या, कढईत तेलात मोहरी, जिरं, हिंग, गोडनिंब घाला,
फोडणी तडतडली की, हिरव्या मिरच्या, लसूण (ठेचून) घाला, हळद, तिखट घालून काकडीचं खिस घाला, अगदी थोडं पाणी घालून काकडी चांगली शिजू द्या, मग चवीपुरतं मीठ, व त्यात मावेल एवढं बेसन हळूहळू मिसळा, आणि सतत पळीने ढवळत रहा.. झाकण ठेवून वाफ येवू द्या, भरपुर कोथिंबीर घालून गरमा गरम भाकरी सोबत, खायला घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तुरीच्या वाटल्या डाळीचं पिठलं
साहित्य:- तुरीची डाळ 2 वाटय़ा, कांदा, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, जिरे-मोहरी, कोथिंबीर, टोमॅटो किंवा कैरी.
कृती:- तुरीची डाळ 3-4 तास भिजत घालावी. डाळ उपसून ती मिक्सरमधून जाडसर बारीक करून घ्यावी. 4-5 कांदे लांब चिरून घ्यावेत, पातेल्यात तेल घालावं. त्यात जिरे-मोहरी, कढीपत्ता व कांदा आणि मिरची पेस्ट टाकावी. कांदा तांबूस झाल्यावर त्यात लसूण पेस्ट टाकावी. त्यानंतर त्यात मीठ, धणो पावडर, हळद टाकावी व टोमॅटो बारीक चिरून किंवा कैरी बारीक करून टाकावी व वाटलेली डाळ त्यात टाकून मिश्रण चांगलं परतवून घ्यावं. वरून झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवावं व एक वाफ येऊ द्यावी. पिठलं शिजल्यावर गॅस बंद करून पिठल्यावर कोथिंबीर पेरावी. हे पिठलं पोळी, भाकरीसोबत चांगलं लागतं. हे पदार्थ विदर्भामधील आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पातीचे पिठलं
साहित्य:- कांद्याची चिरलेली पात – १ वाटी, बेसन – अर्धा वाटी, मिरच्या – ५-६ (आवडीनुसार)
लसुन – १० -१२ पाकळ्या, जीर – १ छोटा टीस्पून, मोहरी – १ छोटा टीस्पून, हिंग – १/२ छोटा टीस्पून, हळद – १/२ छोटा टीस्पून, तेल – ३ चमचे, मीठ चवीनुसार.
कृती : प्रथम मिरची न लसुण एकत्र करून त्याचा जाडसर ठेचा करून घ्या. बेसनात पाणी घालून गुठळ्या एकजीव होई पर्यंत फेटून घ्या. कढईत तेल तापवून त्यात जीरं – मोहरी ,हिंग ह्याची खमंग फोडणी करून घ्या , मग त्यात मिरची – लसणीचा ठेचा छान परतून घ्या. मग त्यात कांद्याची चिरलेली पात घालून परतून घ्या आता चवीनुसार मीठ न थोडी हळद घाला , आता त्यात बेसनाच मिश्रण ओतून द्या , GAS बारीक करा न पळीने सतत फेट्त रहा गुठळ्या नको. भाता बरोबर खायचं असेल तर थोड पातळ ठेवा. काही जण यात ताकही घालतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ओल्या मटारचं पिठलं
साहित्य :- एक वाटी मटारचे दाणे, एक कांदा, ३-४ लसणीच्या पाकळ्या किंवा थोडीशी लसणीची पात,
बेसन, २-३ हिरव्य मिरच्या, फोडणीसाठी तेल, हळद, मीठ, दाण्याचं कुट.
कृती :- एका पॅनमध्ये थोड्याश्या तेलावर मटारचे दाणे आणि हिरव्या मिरच्या नीट परतून घ्या. परतलेले मटार आणि मिरच्या ओबडधोबड वाटून घ्या. पिठल्यासाठी तेलाची फोडणी करून त्यात ठेचलेला लसूण किंवा लसणीची पात आणि कांदा परतून घ्या. त्यातच वाटलेले मटार घालून हळद -मीठ दाण्याचं कुट घालून घ्या. हे सगळं नीट परतलं की त्यात पेला-दिड पेला पाणी घालून उकळी आणा. पाण्याला चांगली उकळी आली की त्यात बेसन घालून चांगलं हाटून घ्या.
पिठलं रटरटेपर्यंत शिजू द्या.
टिप:- जास्त झणझणित पिठलं हवं असेल तर मिरच्या मटारच्या दाण्यांबरोबर परतून वाटण्याऐवजी लसणीच्या पातीबरोबर वाटून पिठल्यात घालाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तव्यावरचे कोरडे पिठलं
साहित्य:- दीड वाटी बेसन (चणा डाळीचे) पीठ ,चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ , ८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरून, फोडणीसाठी दोन टे.स्पून तेल मोहोरी,जिरे,हळद ,हिंग , ८-१० कढीपत्त्याची पाने, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादासाठी थोडी कसूरी मेथी
कृती : एका बाउलमध्ये बेसनाचे पीठ घेऊन त्यात चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ , ८-१० बारीक चिरलेली व ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या व जरूरी प्रमाणे पाणी घालून भज्याप्रमाणे सरबरीत असे पीठ भिजवा. गॅसवर तवा तेल घालून तापत ठेवा,तेल चांगले तापल्यावर प्रथम त्यात मोहोरी व जिरे घाला,दोन्ही चांगले तडतडल्यावरच मग त्यात हळद , हिंग ,कढीपत्त्याची चुरडलेली पाने व कसूरी मेथी घालून परता,आता त्यावर बाउलमध्ये भिजवलेले बेसनाचे पीठ घालून परतत रहा,चांगला खरपूस लाल रंग येईपर्यंत परतत रहा,मग सर्व बाजूंनी चमच्याने तेल सोडून पुन्हा परता. कोरडे पिठलं झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडावेळ झाकून ठेवा व मग पोळीबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
रावण पिठलं
साहित्य:- एक वाटी डाळीच पीठ, एक कांदा, चार- पाच हिरव्या मिरच्या, हळद, चार पाकळ्या लसूण ,
कढीपत्ता, हिंग, एक वाटी तेल, एक वाटी तिखट, पीठ मावेल त्या प्रमाणात किंवा एक वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी, मीठ चवीनुसार.
कृती:- प्रथम फोडणीत हिंग , मिरच्या , हळद , लसून , कढीपत्ता घालावा . कांदा बारीक चिरून घालावा. आता डाळीच्या पीठात पाणी घालून ते आधीच गाठी मोडून घ्यावं. नंतर ते फोडणीत घालून त्यावर थोडे मीठ घालावे. हे पिठलं चांगलं परतावं. वाफेवर शिजू देऊन नंतर ते थोडं घट्ट कराव शक्यतो लोखंडी भांड्यात करावं. गरम गरम भाकरी बरोबर हे पिठलं सर्व्ह करावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कुळीथ पिठलं
तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठलं’ भातावर सुंदर लागते.
जिन्नस:- अर्धी वाटी कुळीथ पीठ, ८-१० कढिलिंबाची पाने, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ, थोडी कोथिंबीर, २ आमसुले,२ पळ्या तेल, फोडणीचे साहित्य.
कृती:- तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.
त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.
कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे. उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कांद्याचे पिठलं
साहित्य:- अर्धी वाटी बेसन पीठ, एक डावभर तेल , एक चमचा मोहरी , एक चमचा जिरे , हिमूटभर हिंग , एक छोटा चमचा हळद,
कृती:- गॅसवर एका पातेल्यात फोडणीसाठी अर्धा डाव तेल गरम करावे. त्यात १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून हिंग, व १ टीस्पून हळद घालून फोडणी करावी. एक बारीक चिरलेला कांदा व चवीनुसार ३-४ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर चार वाट्या पाणी घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे व पाण्याला उकळी येऊ द्यावी. आता एका हाताने चमच्याने ढवळत, दुसऱ्या हाताने थोडे थोडे बेसनाचे पीठ पाण्यात घालावे. घातल्यावर पिठाच्या गाठी होउ देऊ नयेत. घट्ट पिठलं आवडत असल्यास जास्त बेसन लावावे व पातळ पिठलं आवडत असल्यास कमी बेसन लावावे. आता गॅस बारीक करून २ मिनिटे शिजू द्यावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. पोळी, भाकरी किंव्हा भाताबरोबर गरम गरम वाढावे.
टीप :- लसणाचे पिठलं करायचे असल्यास, कांद्याच्या ऐवजी ६-७ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून किंवा ठेचुन फोडणीत घालाव्यात व गुलाबी रंगावर परताव्यात. बाकी सर्व कृती वरील प्रमाणेच.
शेवग्याच्या पानांचे पिठलं(झुणका)
साहित्य – शेवग्याची पाने, कांदे, हरभरा डाळीचे पीठ, तेल, तिखट, मीठ, फोडणीचे साहित्य, चिंच इ.
कृती – शेवग्याची पाने, कांदा बारीक चिरावा. त्यामध्ये तेल, हळद, मीठ घालू एकजीव करावे. एक तास अगोदर चिंच भिजत घालून अर्धा कप पाण्यात हाताने कुस्करावी. जिरे-मोहरीची फोडणी करावी. त्यात कांदा घालावा. नंतर एकजीव केलेले मिश्रण घालावे. त्यावर चिंचेचे पाणी शिंपडावे. अलगद सर्व एकत्र करून मंद आचेवर पाच मिनिटे झाकण ठेवून झुणका वाफवावा. पुन्हा हलवून, झाकण ठेवून पाच मिनिटे वाफवावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply