दिसतं तसं नसतं. म्हणूनच जग फसतं. भाज्या, फळे यांचंही तसंच आहे… चांगलं वाटतं, गोड असतं, चविष्ट लागतं तेवढंच घ्यायचं आणि फळांच्या साली, बिया, त्याची पानं किंवा कोथिंबिरीसारख्या पानांचे देठ फेकून द्यायचे. चुकतं ते इथंच… खरं तर गंमत असते ती ‘साली’तच… साली, बिया, पाने किंवा देठातच प्रथिने आणि जीवनसत्वे असतात. ‘साली’तील तीच गंमत जेवताना एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे चवीत वरखाली झालं तरी आरोग्य मात्र तंदुरुस्त राहील एवढं नक्की! बटाट्याचे, किवीचे, कांद्याचे, लसणाचे साल, कोथिंबिरीचे देठ, कलिंगडाच्या बिया, गाजराची, बीट, मुळा, सलजम यांची पाने यामध्ये असणारी प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांची माहिती घेतल्यावर लक्षात येते आपण या गोष्टी टाकून देऊन किती जीवनसत्वांना मुकतोय, आता ती चूक सुधारायला काय हरकत आहे. त्यासाठी फक्त एवढंच करायचं. बटाट्यामध्ये जेवढी प्रथिने असतात त्यातील निम्मी प्रथिने त्याच्या सालांमध्ये असतात, मात्र बटाट्यावरील साल काढून टाकून त्यातली निम्मी प्रथिने टाकून देत असतो. या सालांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमीन बी कॉम्पलेक्स, व्हिटॅमीन सी आणि मोठ्या प्रमाणात लोह असते. बटाटे वापरताना फक्त ते छान धुवून घ्यायचे. त्याची सालं न काढताच ते वापरले तर त्याचा फायदा जास्त होतो. कांद्याच्या आणि लसणाच्या सालांमध्ये अॅयन्टीऑक्सिडंटचं प्रमाण खूप असतं. गाजर किंवा सलजम, बीट सॅलेडमध्ये वापरतात, पण त्यांची पानं फेकून दिली जातात. वास्तविक या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, नियासीन, लोह, जस्त, व्हिटॅमीन बी आणि के आढळतात. कॅन्सरसारखे अनेक घातक व जीवघेणे रोग बरे करण्यासाठी या पानांचा उपयोग होतो. शिवाय ही पाने खाल्ल्यास हाडेही मजबूत होतात हे लक्षात घ्यायला हवे. कलिंगडाचं साल सफेद किंवा हिरव्या रंगाचं असतं. ते सिट्रोनेल्ला या पदार्थापासून बनलेलं असतं. कलिंगडातील गर खाऊन हे साल टाकून दिलं जातं. पण या सालामध्ये अमिनो अॅोसिड मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. रक्तवाहिन्यांचे कार्य ठीक चालण्यासाठी कलिंगडाचं साल खूप उपयुक्त असते. – गहिर्यास तांबूस रंगाच्या किवीचे साल फायबर आणि पोषक पदार्थांनी भरलेले असते. त्यात व्हिटॅमीन सी भरपूर आढळते. ते मिळवायचं तर किवीचं सूप करताना ते सालांसकट करून पाहायला हरकत नाही! – कोथिंबीरीची पानं आपण चवीने खातो, पण तिच्या देठांचं काय… ते फेकून दिले जातात. वास्तविक कोथिंबीरीच्या देठांमध्ये पानांपेक्षा पाचपटीने जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. हृदय तंदुरुस्त ठेवायचे आणि चिरतरुण राहायचे तर या देठांचा वापर उत्तम. – कलिंगड खाताना त्यातील बिया निवडून निवडून टाकून दिल्या जातात, पण या बियांमध्ये लोह, झिंक आणि कॉपर मोठ्या प्रमाणावर असते. हे ज्यांना ठाऊक आहे ते कलिंगडाबरोबर त्यातील बियाही खातात. या बियांमुळे प्रजनन क्षमता वाढते आणि हृदयही मजबूत राहाते.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
Leave a Reply