उपवासासाठी साबूदाण्याचे थालीपीठ
साहित्य :- दोन वाट्या साबूदाणा, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी दाण्याचे कूट, बारीक मीठ, जिरेपूड, बारीक चिरलेल्या चार हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चमचाभर लिंबाचा रस, तूप अथवा रिफाइंड शेंगदाणा तेल.
कृती :- साबूदाणा चार तास भिजवून घ्यावा. उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून मऊ झालेल्या साबूदाण्यात मिसळावेत. त्यात दाण्याचे बारीक कूट, मीठ, मिरची, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस घालून सर्व मळून घ्यावे. मिरचीऐवजी लाल तिखट पूडही घालता येईल. प्लॅस्टिकच्या कागदावर थालीपीठ थापून तापलेल्या तव्यावर तूप सोडून त्यावर घालावे. मध्ये भोक पाडून त्यातही तूप वा तेल सोडावे. मंद विस्तवावर दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत भाजून घ्यावे. उपवासाच्या हिरव्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ
भाजणी करण्याची कृती :- राजगिरा, साबूदाणा व वऱ्याचे तांदूळ समप्रमाणात घेऊन भाजावेत. त्यात थोडे जिरे घालावेत व सर्व एकत्र दळून पीठ करावे. ही भाजणी बरेच दिवस टिकते.
साहित्य :- जितकी थालीपिठे बनवायची त्याप्रमाणे भाजणी घ्यावी. एक वाटी भाजणी असल्यास अर्धी वाटी दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, बारीक वाटलेली वा चिरलेली मिरची, थोडे जिरे, कोथिंबीर, तूप.
कृती :- भाजणी, दाण्याचे कूट, मीठ, मिरची (अथवा लाल तिखट), जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर- सर्व एकत्र करून थोडे पाणी घालून मळून घ्यावे. तव्यावर तूप सोडून थालीपीठ लावावे. मंद विस्तवावर भाजावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साबुदाणा लिची पुडिंग
साहित्य :- अर्धी वाटी साबुदाणा, अर्धा कप साखर, एक लिटर घट्ट दूध, 5-6 लिची बिया काढून, दोन चमचे बदामाचे काप (भाजून), अर्धा चमचा वेलचीपूड.
कृती :- साबुदाणा धुऊन भिजवत ठेवावा. लिची साखरेत शिजवून घ्यावी व गार करावी. दूध आटवत ठेवावे. त्यातच साबुदाणा घालून घट्ट खीर बनवावी व गार करावी. आता त्यात लिची घालावी व वेलचीपूडही घालावी. हे मिश्रण बाऊलमध्ये सेट करायला ठेवावे. वरून भाजलेले बदामाचे काप घालून सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply