श्रावण वद्य अमावास्या – बैल पोळा
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’
भारत हा शेतीप्रधान देश आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल मदत घेतली जाते. बैल वर्षभर शेतात राबत असतो. त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस बैलपोळा साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा सण शेतकरी साजरा करतात. या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालून सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल घालून सजवतात. बैलांना वाजत गाजत मारूतीच्या दर्शनाला नेतात. त्या दिवशी बैलांना पूर्ण विश्रांती देतात. संध्याकाळी बैल वाजत गाजत आले की त्यांची पूजा करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात.
ज्यांचा शेती हा व्यवसाय नाही ते लोक या दिवशी मातीच्या बैलाच्या मूर्ती विकत आणून पाटावर गहू पसरून त्यावर बैल मांडून त्यांची पूजा करतात. जेवणात पुरणपोळी हे प्रमुख पक्वान्न केले जाते.
याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘ अतित कोण ?’ असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बैलपोळा स्पेशल पुरणपोळी
साहित्य : अर्धा किलो हरभरा डाळ, पाव किलो गूळ, पाव किलो साखर, एक चमचा वेलची पूड, एक चमचा जायफळ पूड, चिमूटभर मीठ, मैद्याच्या चाळणीने चाळलेली कणीक दीड वाटी, पाव वाटी मैदा, लाटायला तांदूळ पिठी, अर्धी वाटी तेल.
कृती : हरभरा डाळ धुऊन स्वच्छ करून मऊ शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर चाळणीवर ओतून निथळून घ्यावी. त्यात गूळ, साखर घालून जाड कढईत पुन्हा चटका द्यावा.शिजताना मिश्रण सतत हलवत राहावे.
सुरवातीला पातळ असलेले मिश्रण नंतर घट्ट होईल. चांगले घट्ट झाले म्हणजे त्यात उलथणे सरळ घट्ट उभे राहिल. गरम असतानाच पुरण यंत्रातून बारीक जाळी लावून पुरण वाटून घ्यावे. त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घालून मिश्रण बाजूला ठेवावे. परातीत मैदा, कणीक व मीठ घालून पीठ भिजवावे.
थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली मळून घ्यावी. पुरणपोळीची कणीक नेहमी इतर कणकेपेक्षा सैल असते. थोडा वेळ कणीक झाकून ठेवावी. नंतर हातावर कणकेचा लिंबाएवढा गोळा करून त्याचा खोल उंडा करावा. त्यात कणकेच्या दीडपट पुरण भरावे.
तोंड बंद करून पिठीवर हलक्या हाताने लाटावे. नॉनस्टिक किंवा बीडाच्या तव्यावर पोळी भाजावी. सारखी पोळी उलटू नये. दुसरी पोळी टाकण्यापूर्वी तवा पुसून घ्यावा. काही ठिकाणी पोळी करताना फक्त गूळच वापरतात. साखरेमुळे पुरणाला किंचित चकाकी येते, तर गुळामुळे पुरण खमंग लागते.
टिप्स:
पुरणपोळी करताना
पुरण शिजवतानाच त्यात थोडं सूंठ आणि आलं बारीक करून घालावं. पुरण पचायला हलकं होतं. बरेच लोक पुरणपोळी आवडत असूनही पचत नाही म्हणून खात नाहीत. पण त्यात दोन ग्लास चण्याच्या डाळीत अर्धी वाटी तुरीची डाळ घातल्यास पुरण पचायला हलकं होतं. पुरण शिजत असतानाच त्यात थोडं मीठ आणि जायफळ घालावं. चवीला पुरण पोळी जास्त चविष्ट लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply