वांगी वडे
साहित्य:- वांगी, फोडणीचे साहित्य, तेल, थालीपिठाची भाजणी, धने-जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा-तीळ, तीखट, मीठ, दही, डाळीचे पीठ.
कृती :- वांग्याचे पातळ काप करावेत व चिरून ते पाण्यात ठेवावे. जरा जास्त तेलात हिंग, मोहरी, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात वांगीकाप घालून अंदाजे मीठ, तिखट, धने-जिरे पावडर चिमूटभर साखर घालून भाजी वाफवून घ्यावी. भाजी शिजली की झाकण काढून त्याला बेसन लावावे व खमंग पीठभाजी तयार करावी. खाली उतरवून गार करावी. थोडक्यात वांग्याची पीठभाजी करणे.
एका परातीत वांग्याची भाजी घ्यावी. मग जेवढे वडे करायचे असतील तेवढीच थालीपीठ भाजणी घ्यावी व भाजी मिसळावी. एका कढल्यात तेल कडकडीत गरम करावे व खाली उतरवून त्यात तिखट, हळद, धने-जिरे पावडर, तीळ व ओवा घालून पिठात मिसळावे. भाजी + कढल्यातले मसाले, १ चमचा दही, प्रमाणात मीठ घालून मळावे. त्यात बारीक कापलेली कोथिंबीर घालून कोरडे वाटल्यास थोडे कोमट पाणी घालून वडय़ाचे पीठ वडे थापता येतील इतपत भिजवावे व वडे घालून तेलात तळावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वांग्याची चटणी
साहित्य : अगदी कोवळी ताजी वांगी, 4-5 हिरव्या मिरच्या, दाण्याचे कूट अर्धी वाटी, कोथिंबीर, गूळ, मीठ, लिंबू, फोडणीचे साहित्य.
कृती : प्रथम वांग्याचे लहान लहान तुकडे 1 वाटी घ्यावे. बिया असल्यास काढाव्यात. मिरच्याचे तुकडे मोठेच करावेत. एका मिरचीचे दोन तुकडे याप्रमाणे अर्धी वाटी तेलाची मोहरी टाकून फोडणी करावी. त्यात थोडा जास्त हिंग घालावा. नंतर फोडणीवर वांग्याचे व मिरच्याचे तुकडे टाकून चांगली वाफ आणावी. कढई खाली उतरवून वाफ आलेल्या मिरच्या घेऊन त्यात गूळ, मीठ टाकून हाताने कुस्करून मऊ करावे नंतर तो गोळा, कोथिंबीर, दाण्याचे कूट हे सर्व वांग्याचा फोडीवर घालून सर्व चांगले मिसळावे. आंबटपणाकरिता थोडा लिंबाचा रस चवीप्रमाणे टाकावा. वांग्याची चटणी तयार….
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
डाळ वांगे
साहित्य:- ३-४ मध्यम आकाराची वांगी, १ वाटी तूरडाळ, १ लहान लिंबाएवढी चिंच, १/२ लहान लिंबाएवढा गूळ, १ टेबलस्पून कांदा लसूण मसाला, १ टीस्पून धने पावडर, १/२ टीस्पून जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, १ टेबलस्पून खोबरे, २ लसूण पाकळया, थोडी चिरलेली कोथिंबीर, पाणी लागेल तसे. २ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता.
कृती:- वांगी धुवुन चिरुन एका वांग्याच्या ८-१० फोडी होतील अशी चिरुन घ्यावीत. चिरलेली वांगी एका बाऊलमधे पाण्यात घालून ठेवावीत. तूरडाळ धुवुन त्यात २ कप पाणी घालावे. त्यात चिरलेली वांगी पाण्यातुन काढुन निथळून घालावीत. कुकरला ३ शिट्ट्या करुन शिजवुन घ्यावे. खोबरे, लसुण आणि थोडी चिरलेली कोथिंबीर बारीक करुन घ्यावे. चिंच एका बाऊलमधे घालून त्यावर गरम पाणी ओतुन ठेवावे. कुकरचे प्रेशर उतरले की एका पातेल्यात तेल तापायला ठेवावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी.त्यात वाटलेला लसुन खोब-याचा गोळा घालावा. अगदी हलकेच परतावे. लसुण-खोबरे करपता कामा नये. त्यात शिजलेले डाळ-वांगे घालावे. मीठ, कांदा लसुण मसाला, गुळ घालावा. भिजवलेली चिंच कुस्करुन कोळ काढुन तो पण डाळीत घालावा. गरज असेल तर १/२ वाटी पाणी घालावे. नीट उकळी आणुन वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वांग्याचे लोणचे
साहित्य:-७५० ग्रॅम लहान गोल वांगी, १० लसूण पाकळ्या, २ इंच आले, १५ लाल मिरच्या, ११५ मिली व्हिनेगर, ५ चमचे मोहरीची डाळ, १ चमचा हळद, १२५ ग्रॅम गूळ, ६ मोठे वेलदोडे, १ इंच दालचिनी,४ लवंगा, १० मिऱ्याचे दाणे, ६ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, ५ चमचे मीठ.
कृती:- आले-लसूण बारीक वाटून घ्यावे. लाल मिरच्या चमचाभर व्हिनीगरमधे बारीक वाटाव्या.
गूळ व्हिनीगरमध्ये विरघळवून ठेवावा. वांगी धुवून पुसून ठेवावी. व त्यांचे १ सें.मी. जाड काप चिरून ठेवावे. कल्हईच्या पातेल्यात तेल तापले की मोहरी व हळद घालून त्यावर आले-लसूण तांबूस होईपर्यंत परतावी. त्यात वांग्याचे काप घालून हलक्या हाताने पातेलीत घालून सोडावे. वांगी मंदाग्निवर शिजू द्यावीत. एकीकडे वेलची, लवंगा, दालचिनी व मिरी यांची बारीक पूड करावी. वांगी मधूनच एकदोनदा झाऱ्याने अलगद ढवळावीत. वांगी शिजली की गुळाचे मिश्रण घालावे. दाटसर रस होईपर्यंत शिजवावे. नंतर लवंग-दालचिनी इत्यादीची पूड घालावी. मोहरीची डाळ व मीठ घालावे. खाली उतरवून लोणचे गार होऊ द्यावे. नंतर काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वांगी बटाटा काचऱ्या
साहित्य:- ८ ते १० लहान वांगी, २ मध्यम बटाटे, १/२ कप बारीक चिरलेला कांदा, २ टेस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४ ते ५ कढीपत्ता पाने, २ टेस्पून शेंगदाण्याचा कूट, २ टेस्पून ताजा खोवलेला नारळ, चवीपुरते मीठ, १/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार.
कृती:- वांगी धुवून घ्यावीत आणि देठं कापून टाकावीत. प्रत्येक वांग्याच्या उभ्या चार फोडी कराव्यात. आणि चतकोर आकाराच्या काचऱ्या कराव्यात. गार पाण्यात बुडवून ठेवाव्यात. बटाटे सोलून उभे चार भाग करून पातळ काचऱ्या कराव्यात. कढईत तेल गरम करावे. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. कांदा आणि बटाटा घालावा. थोडे मीठ घालावे. झाकण ठेवून बटाटे ५०% शिजवावे. वांग्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकावे. वांग्याच्या काचऱ्या कढईत घालाव्यात. झाकण न ठेवता वांगी परतत राहावी. वांगी पटकन शिजतात, म्हणून कढईवर झाकण ठेवू नये. वांगी शिजली कि चव पाहून लागल्यास मीठ घालावे. आता शेंगदाण्याचा कूट, साखर, आणि नारळ घालून मिक्स करावे. एक दोन मिनिटे भाजी परतावी आणि गरमच पोळीबरोबर किंवा आमटी भाताबरोबर वाढावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply