भाजणीचे थालीपीठ
साहित्य : तीन वाट्या भाजणी, दोन कांदे, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, मीठ, कोथिंबीर, तेल, पातीचा कांदा.
कृती : कांदे बारीक चिरून घ्यावेत. पातीचा कांदाही बारीक चिरून बाजूला ठेवावा. भाजणीमध्ये चिरलेला कांदा, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून कोमट पाण्यात पीठ भिजवून ठेवावे. तव्यावर एक चमचा तेल घालून पिठाचा उंडा तव्यावर थापावा. मध्ये एक भोक पाडून त्यावर तेल सोडावे. वरून कांद्याची पात दाबावी. तव्यावर झाकणी टाकून थालीपीठ खमंग भाजावे. दुसरी बाजू उलटून टाकावी. नंतरची थालीपिठं प्लॅस्टिकच्या कागदावर तेलाचा हात लावून थापावीत. तव्यावर टाकून भाजावीत. गरम थालीपीठ लोणी, घट्ट दही, गोड लिंबाचे लोणचे चवीसाठी द्यावे. म्हणजे मिनी जेवणच!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजणीचे धपाटे
साहित्य : दोन वाट्या भाजणीचे पीठ, एक वाटी ज्वारीचे पीठ, दोन कांदे, एक चमचा लाल तिखट, एक वाटी ताजे ताक, कोथिंबीर, मीठ, तेल.
कृती : कांदे किसून घ्यावेत. त्यात भाजणीचे पीठ, ज्वारीचे पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घालून मळावे. लागेल तसे ताक घालावे. कांद्याच्या किसाला पाणी सुटते. पोळपाटावर थोडेसे पीठ पसरून त्यावर पिठाचा उंडा थापावा (भाकरीप्रमाणे). धपाटी थोडी जाडसरच थापावीत. गरम तव्यावर धपाटी पिठाची बाजू वर करून टाकावीत. पिठाच्या बाजूला थोडा पाण्याचा हात लावावा. धपाटी उलटून टाकल्यावर तेल सोडावे. दोन्ही बाजूंनी थोडे थोडे तेल सोडून धपाटी खमंग भाजावीत. गरम धपाटी दही, लोणी, दाण्याच्या चटणीबरोबर खायला द्यावीत. दोन दिवस चांगली राहतात. दुसऱ्या दिवशीसुद्धा खमंग लागतात. प्रवासात न्यायला चांगली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजणीचे मुटके
साहित्य : दोन वाट्या भाजणीपीठ, एक वाटी मेथीची पाने, एक चमचा धने-जिरे पूड, 5-6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, नारळाचा चव, मीठ, तेल, 2 पातीचे कांदे.
कृती : मेथीची पाने धुऊन घ्यावीत. (फक्त पाने, काड्या नकोत) हिरवी मिरची, लसूण वाटून घ्यावे. वाटताना कोथिंबीर घालावी. भाजणीपिठात मेथीपाने, वाटलेले लसूण, हिरवी मिरची, धने-जिरेपूड, मीठ घालून मळावे. लागल्यास थोडे पाणी घालावे. तेलाचा हात लावून पिठाचे मुटके अगर गोल रोल करून ठेवावेत. कुकरमधील पाण्याला उकळी आली की कुकरच्या भांड्याला तेलाचा हात लावून मुटके ठेवावेत. मुटके उकडण्यास 15-20 मिनिटे लागतात. थंड झाल्यावर मुटक्याचे सुरीने गोल काप करावेत. कढईत तेल, मोहरी, पांढरे तीळ, जिरे, कढीलिंब घालून फोडणी करावी, फोडणीत गोल काप घालून दोन मिनिटे परतावे. आवडत असेल तर वरून लाल तिखट भुरभुरावे. बाऊलमध्ये काप काढून घ्यावेत. त्यावर नारळचव, कोथिंबीर, कांद्याची पात बारीक चिरून घालावी. भाजणीचे मुटके खमंग, चवदार लागतात. सोबत काकडीची दही घालून केलेली कोशिंबीर द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजणीची कडबोळी
साहित्य : तीन वाट्या भाजणीचे पीठ, दोन चमचे लोण्याचे मोहन, दीड चमचा लाल तिखट, एक चमचा ओवा, एक चमचा पांढरे तीळ, दोन चमचे धने-जिरेपूड, हिंग, तेल.
कृती : दोन चमचे लोणी परातीत घेऊन चवीला मीठ घालून चांगले फेटावे. त्यावर भाजणीचे पीठ, तिखट, धने-जिरेपूड, ओवा, तीळ, हिंग घालून पीठ मळावे. लागेल तसे कोमट पाणी घालून भाजणीपीठ घट्ट भिजवून ठेवावे. अर्ध्या तासाने कोमट पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यावे. कडबोळी वळून ठेवावीत. रिफाइंड तेलात तांबूस रंगावर मंद आचेवर तळून काढावीत. खुसखुशीत खमंग कडबोळी दही, लोणी, सॉसबरोबर खायला द्यावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजणीच्या पुऱ्या
साहित्य : दोन वाट्या भाजणी, एक वाटी गव्हाचे पीठ, धने-जिरेपूड, एक चमचा मिरपूड, एक चमचा लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, तेल, एक चमचा ओवा.
कृती : भाजणीमध्ये दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालावे. भाजणी व गव्हाच्या पिठात धने-जिरेपूड, मिरपूड, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, ओवा घालून घट्ट भिजवून ठेवावे. अर्ध्या तासानंतर तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे. लहान लहान गोळे करून पुऱ्या लाटून ठेवाव्यात. रिफाइंड तेलात पुऱ्या तळून काढाव्यात. ओल्या नारळाची चटणी आणि गरम पुऱ्या सर्व्ह कराव्यात. पुऱ्या 3-4 दिवस टिकतात. शिळ्या पुऱ्या खमंग लागतात. प्रवासात न्यायला हरकत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाजणीच्या गोळ्यांची आमटी
साहित्य : एक वाटी भाजणीचे पीठ, दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, दोन चमचे शेंगदाणे, एक चमचा पांढरे तीळ, एक चमचा खसखस, एक चमचा धने, 7-8 लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ, पाव वाटी चिंचेचा कोळ, गूळ, कोथिंबीर.
कृती : शेंगदाणे, तीळ, खोबऱ्याचा कीस, खसखस या क्रमाने कढईत टाकून भाजावे. शेवटी धने टाकावेत. सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटावे. हा तयार मसाला बाजूला ठेवावा. भाजणीच्या पिठात लसूण ठेचून घालावा. चवीपुरते मीठ, थोडे तिखट, कोथिंबीर घालून भाजणीचे पीठ मळून ठेवावे. तेलाचा हात लावून पिठाचे छोटे छोटे गोळे करून ठेवावेत. कढईत तेल, मोहरी, जिरे, कढीलिंब, हिंग घालून फोडणी करावी. फोडणीत तयार गोळे सोडावेत. एक मिनिट गोळे फोडणीत परतावेत. तयार मसाला घालावा. मीठ, थोडे लाल तिखट घालून परतावे. चार वाट्या पाणी घालावे. चिंचेचा कोळ घालावा. चवीला गूळ घालावा. चांगले उकळावे. वरून कोथिंबीर घालावी. आवडीप्रमाणे आमटी घट्ट अगर पातळ करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply