भारतीय खाद्यसंस्कृती – भाग २ – अतिप्राचीन काळ

भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.


आजपासून ३० ते ६० हजार वर्षांपूर्वी ‘नेग्रिटोज’ हे लोक आफ्रिकेहून भारतात प्रथम आले. भारतातले ते पहिले रहिवासी मानले जातात. मांस, मासे, कंदमुळे आणि फळे यांवर या लोकांची गुजराण होत असे.

त्यानंतरचे भारतातील लोक म्हणजे पोऍस्ट्रॅलॉइडस्? किंवा ऑस्ट्रिक्स. हे लोक स्वत:साठी भाज्या आणि फळे उत्पादित करू शकत. विड्याचं पान आणि सुपारीची त्यांना माहिती होती. आपल्या आहारात सध्या असलेल्या फळांपैकी कित्येक फळे त्या काळीही उत्पादित होत होती. भारतीय संस्कृतीचा पाया या लोकांनी रचला असं काही जाणकारांचं मत आहे. तांदूळ आणि भाज्यांचं उत्पादन कसं करायचं हे त्यांना माहीत होतं. उसापासून साखर करण्याची माहितीही त्यांना होती. दक्षिण मध्य आणि पूर्व भारतात त्यांची वस्ती होती. अजूनही त्या वंशाचे लोक मध्य आणि पूर्व भारतात आढळतात. भारताच्या उत्तर पूर्व भागात मँगोलाइडस् आढळतात.

या नंतरच्या काळात द्रविड लोक भारतात, विशेष करून दक्षिण भारतात आले. तोपर्यंत कच्चे अन्न पचायला त्रास होतो हे कळल्यामुळे अन्न शिजविण्याच्या विविध पद्धती उदयाला येऊ लागल्या होत्या. भाजणे, उकडणे, तळणे या पद्धती द्रविड लोकांना माहिती होत्या. तांदूळ शिजवून भात करणे, तांदूळ वाटून ते पीठ आंबवून त्यापासून पदार्थ करणे, बार्ली, मांस, यासारख्या गोष्टी तळण्याचा उपयोग करून वापरणे या गोष्टी ते करीत असत. मूग, मसूर आणि उडीद या कडधान्यांचा उपयोगही ते करीत. नीरा आणि ताडीचाही उपयोग पिण्यासाठी केला जाई. सागरकिनार्‍यामुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या मासे आणि नारळ यांचा उपयोग त्या काळीही केला जात होता आणि आजही होतो.

सिंधुसंस्कृतीमधे गहू, बार्ली, तीळ यांचा उपयोग केला जात होता. उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून ही अनुमाने काढली गेली आहेत. ख्रिस्तपूर्व २५०० वर्षांपूर्वींच्या त्या काळात रोटी भाजण्यासाठी तंदूर वापरला जाई. म्हशी, बकर्‍या पाळून दूधदुभत्याचा भरपूर वापर केला जाई. फळांचा वापरही भरपूर केला जाई. पाटा, वरवंटा, जाते, रव्या, लाटणी अशा गोष्टी उत्खननात सापडल्या आहेत त्यावरून अन्न पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींची कल्पना येते. सिंधूसंस्कृतीचा काळ साधारणपणे ख्रिस्तपूर्व ३३०० ते १७०० असा धरला जातो. त्या संस्कृतीमधले लोक कोण होते या बद्दल विद्वानांची वेगवेगळी मते आहेत. आर्यांचं आगमन झाल्यावर सिंधूसंस्कृतीचा नाश झाला असं काही लोक मानतात. ख्रिस्तपूर्व १७०० ते ५०० हा वैदिक काळ मानला जातो.

— डॉ. वर्षा जोशी

## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग २

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*