भारतीय खाद्यसंस्कृती या विषयावर डॉ. वर्षा जोशी यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदिर्घ लेख
क्रमश: स्वरुपात प्रकाशित करत आहोत.
रामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे. वानर हे पूर्ण शाकाहारी होते. त्याकाळी तांदूळ, यव व गहू ही धान्ये व मूग, चणे, कुळीथ. उडीद यांच्या डाळी वापरत. खिचडी, तांदूळ व तीळ यांची खीर, खवा, तुपात शिजविलेले पदार्थ, खव्याचे पदार्थ, सूप म्हणजे आमटी, कढी किंवा रस्सा यांचा अंतर्भाव आहारात होता. राक्षसांच्या भोजनात विविध प्रकारचे मांसांचे पदार्थ, गोडाचे, तिखटमिठाचे व आंबट पदार्थ आणि फळे असत. पाकविद्या त्यावेळी प्रतिष्ठा पावलेली होती. लक्ष्मण उत्तम स्वयंपाक करी. मांस आणि मासे यांचे चविष्ट पदार्थ तो बनवित असे.
महाभारतकाळातही वडे, विविध प्रकारच्या भाज्या, खीर, खिचडी, लाडू, मोदक, करंज्या, मांसाचे पदार्थ बनविले जात. भीम एक उत्तम स्वयंपाकी होता. असं म्हणतात की श्रीखंड हा पदार्थ त्याने प्रथम बनविला. विविध फळांचे तुकडे एकत्र करून त्यामधे दही घालून तो “शिखरिणी” नावाचा पदार्थ बनवी. या शिखरिणीचा अपभ्रंश होऊन नतर बहुतेक “शिकरण” जन्माला आली. पण भीमाची शिखरिणी म्हणजे दह्यातलं फ्रूट सॅलडच होतं. पांडव अज्ञातवासात असतांना भीम हा विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणून स्वयंपाकाचं काम करीत होता हे महाभारतात वाचलेलं सर्वांनाच माहीत असतं.
भीम आणि लक्ष्मण यांच्याप्रमाणे पाकविद्येत पारंगत असलेली आणखी एक पुराणकालीन व्यक्ती म्हणजे नलराजा. कमाल म्हणजे या नलराजाने लिहिलेला पाकदर्पण हा ग्रंथ आजसुद्धा उपलब्ध आहे. हा ग्रंथ नक्की कोणी लिहिला याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण ग्रंथात असलेले काही उल्लेख मात्र असंच दर्शवतात की तो नलदमयंती प्रसिद्ध निषध देशाचा राजा नल यानेच लिहिला असावा. असं म्हणतात की नलराजाने देवांकडून पाकविद्या, जलविद्या, अग्निविद्या, अशा आठ वरदानांची प्राप्ती केली होती.
द्युतामधे राज्य हरल्यावर राजा ऋतुपर्णाकडे बाहुक म्हणून त्याच्या सेवेत नलराजा राहिला. ऋतुपर्णाबरोबर त्याने पाकविद्येवर केलेली चर्चा म्हणजेच ‘पाकदर्पण’ हा ग्रंथ होय. ह्या ग्रंथाला एकूण अकरा प्रकरणे आहेत. पहिल्यामधे विविध प्रकारच्या पाककृती. दुसऱ्यात कोणत्या ऋतुमधे कोणते पदार्थ खाणे योग्य, तिसऱ्यात भक्ष्य, भोज्य वगैरे पदार्थांचे वर्णन, चौथ्यात खिरींचे विविध प्रकार व त्यातील फरक, पाचव्यात पेय पदार्थ, सहाव्यात आमटी, कढण यासारखे पदार्थ व त्यांच्या कृती, सातव्यात तुपामधे तयार केलेले पदार्थ, आठव्यात चाटून खाण्यायोग्य पदार्थांच्या कृती, नवव्यात पाणी थंड करण्याच्या कृती, दहाव्यात आटीव दूध, दही, मठ्ठा, खीर यांच्या कृती आणि अकराव्यात मातीच्या छोट्या बुडकुल्यांमधे दूध घालून त्याचं वेगवेगळ्या पदार्थांत रूपांतर करण्याच्या कृती अशा प्रकारे विविध पाककृतींचे वर्णन केले आहे.
संस्कृतमधे असलेला नलराजाचा ‘पाकदर्पण’ हा ग्रंथ म्हणजे भारतातलं स्वयंपाकावरचं आणि आहारशास्त्रावरचं पहिलं पुस्तक असावं.
— डॉ. वर्षा जोशी
## भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ५
Leave a Reply