चटण्यांचे प्रकार

1) इडली चटणी
इडलीबरोबर कोरड्या किंवा ओल्या प्रकारच्या चटण्या बनवतात. ही चटणी इडली किंवा डोशाबरोबर सर्व्ह करायला छान आहे. चटणी बनविताना चणाडाळ, शेंगदाणे, ओला नारळ, लसूण, साखर, जिरे, पंढरपुरी डाळ, हिरवी मिरची वापरली आहे, त्यामुळे ही चटणी पौष्टिक तर आहेच व वरतून फोडणी दिल्यामुळे छान खमंग लागते.
साहित्य
एक टेबलस्पून चणाडाळ, अर्धा टेबलस्पून शेंगदाणे, 1 कप ओला नारळ (खोवून), 4 लसूण पाकळ्या, पाव टी स्पून जिरे, 2 टेबल स्पून पंढरपुरी डाळ, अर्धा कप दही, हिरव्या मिरच्या, 2 टेबल स्पून कोथिंबीर, साखर व मीठ चवीने.
फोडणीकरिता
एक टेबल स्पून तेल, 1 टी स्पून मोहरी, पाव टी स्पून हिंग, 1 लाल सुकी मिरची, 7-8 कढीपत्ता पाने.
कृती
चणाडाळ 4-5 तास भिजत ठेवावी. शेंगदाणे भाजून साले काढून घ्यावेत. ओला नारळ खोवून घ्यावा. कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी. मिक्‍सरच्या भांड्यात चणाडाळ, शेंगदाणे, पंढरपुरी डाळ, ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, साखर, मीठ, जिरे, पाव कप पाणी घालून मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावे. एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता पाने, लाल मिरची घालून फोडणी करून वाटलेल्या चटणीवरती घालून, मिक्‍स करून मग दही मिक्‍स करावे. इडली, डोसा किंवा मेदूवड्याबरोबर ही चटणी सर्व्ह करावी छान लागते.


2) इडलीची सुकी चटणी
इडली, डोसा याबरोबर ही सुकी चटणी चविष्ट लागते.
साहित्य : एक कप उडीदडाळ, पाऊण कप चणाडाळ, 5-6 लाल सुक्‍या मिरच्या, 2 टेबल स्पून तीळ, 1 टेबल स्पून कढीपत्ता, पाव कप सुके खोबरे (किसून).
फोडणीकरिता
एक टेबल स्पून तेल, 1 टी स्पून मोहरी, पाव टी स्पून हिंग
कृती:
कढईमध्ये एक टे. स्पून तेल गरम करून त्यामध्ये उडीदडाळ, चणाडाळ, तीळ, लाल मिरची, कढीपत्ता पाने, मीठ व सुके खोबरे घालून —— मिनीट मंद विस्तवावर परतून घ्यावे. मग मिक्‍सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे.
फोडणीकरिता एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग घालून फोडणी वाटलेल्या चटणीवर घालून मिक्‍स करावी.


3) कच्चा टोमॅटोची चटणी
ही चटणी चपातीबरोबर किंवा वडे, कबाबबरोबर छान लागते.
साहित्य : दोन मोठे हिरवे टोमॅटो (चिरून), एक छोटा कांदा (चिरून), दोन हिरव्या मिरच्या (चिरून), एक टेबल स्पून शेंगदाणे कूट, 1 टेबल स्पून कोथिंबीर (चिरून) साखर व मीठ चवीने
फोडणीकरिता 1 टेबल स्पून तूप (गरम), 1 टी स्पून जिरे
कृती:
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून मिक्‍स करून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर 2-3 मिनिट शिजू द्यावे. मग त्यामध्ये मीठ, साखर, कोथिंबीर घालून मिक्‍स करून 1-2 मिनिटे मंद विस्तवावर शिजू द्यावे.


4) कवठाची चटणी
कवठाची चटणी ही चवीला आंबट-गोड अशी लागते. ही चटणी उपवासाच्या दिवशीसुद्धा करता येते. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी ही चटणी मुद्दाम करतात. आपण नेहमीच नारळाची, पुदिन्याची चटणी बनवतो.
साहित्य : एक कप ताज्या कवठाचा गर, 1 टी स्पून जिरे पावडर, 1 कप गूळ, 1 टी स्पून लाल मिरची पावडर, मीठ चवीने.
कृती : कवठ फोडून त्याच्या मधील गर काढून घ्यावा व चमच्याने चांगला फेटून घ्यावा. जेवडा कवठाचा गर असेल तेवढा गूळ घ्यावा. जिरे थोडेसे भाजून बारीक करावे. मग कवठाचा गर, जिरे पूड, गूळ, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्‍स करावे.
लाल मिरची पावडर व जिरे न टाकतासुद्धा ही चटणी छान लागते. गोड हवे असेल तर थोडी साखर मिक्‍स करावी.


6) काळ्या मनुक्‍यांची चटणी
काळ्या मनुक्‍यांची चटणी छान आंबट-गोड अशी लागते. मनुके गोड असतात, त्यामुळे साखर घातली नाही तरी चालते.
साहित्य : एक कप काळे मनुके (बिया काढून), 2 टेबल स्पून काळे मनुके (बारीक चिरून), 1 टेबल स्पून लाल मिरची पावडर, 1 टेबल स्पून जिरे पावडर, 10 पुदिना पाने, 2 टेबल स्पून गूळ, 3 टेबल स्पून लिंबूरस, 1 टी स्पून मीठ.
कृती:
काळे मनुके धुऊन एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवावेत.
मिक्‍सरमध्ये लाल मिरची पावडर, जिरे पावडर, पुदिना पाने, गूळ, लिंबूरस, मीठ घालून चटणी वाटून घ्यावी. चटणी वाटून झाली की मनुके घालून मिक्‍स करून अर्धा तास चटणी तशीच बाजूला ठेवावी. मग सर्व्ह करावी.


7) काश्‍मिरी डाळिंबाची चटणी
काश्‍मिरी डाळिंबाची चटणीही काश्‍मिरी पद्धतीने बनवली आहे. त्यामध्ये डाळिंबाचे ताजे दाणे वापरले आहेत. तसेच कांदा, कोथिंबीर व पुदिना वापरला आहे. पुदिन्यामुळे चटणीला छान सुगंध व चव येते. ही चटणी सामोसे, वडे याबरोबर उत्कृष्ट लागते.
साहित्य:
एक कप डाळिंबाचे दाणे, अर्धा कप कोथिंबीर, पाव कप पुदिना पाने, एक छोटा कांदा, 2 हिरव्या मिरच्या (लहान), 1 टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून चाट मसाला, अर्धा टी स्पून लिंबूरस, मीठ व साखर चवीने.
कृती:
कोथिंबीर, पुदिना पाने धुऊन चिरून घ्यावीत. हिरवी मिरची चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा. जिरे कुटून घ्यावे. डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, कांदा, जिरे, चाट मसाला, लिंबूरस, मीठ, साखर व 3-4 टेबल स्पून पाणी घालून मिक्‍सरमध्ये चटणी बारीक वाटून घ्यावी. काश्‍मिरी डाळिंबाची चटणी सामोसे किंवा वड्याबरोबर छान लागते.


8) तिखट पंचामृत
पंचामृत हा महाराष्ट्रीय लोकांची प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. जसे आपण जेवणामध्ये कोशिंबीर घेतो, तसेच पंचामृतही बनवण्याची पद्धत आहे. पंचामृत हे चवीला आंबट-गोड व उत्कृष्ट लागते.
साहित्य : अर्धा कप चिंच, अर्धा कप सुके खोबरे (किसून), अर्धा कप शेंगदाणे (भाजून), अर्धा कप तीळ (भाजून), पाव कप काजू तुकडे, 6-7 हिरव्या मिरच्या, मीठ व गूळ चवीने.
फोडणीसाठी: पाव कप तेल, 1 टी स्पून मोहरी, पाव टी स्पून हिंग, पाव टी स्पून हळद
कृती : सुके खोबरे, तीळ व शेंगदाणे भाजून थोडे जाडसर कुटून घ्यावेत. चिंचेचा कोळ काढून घ्यावा.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग, हिरव्या मिरच्या घालून खमंग फोडणी करावी. मग त्यामध्ये कुटलेले खोबरे, तीळ, शेंगदाणे घालून एक मिनिट वाफ आणावी. वाफ आल्यावर त्यामध्ये काजूचे तुकडे मीठ, चिंचेचा कोळ, गूळ व एक कप पाणी घालून एक चांगली उकळी आणावी.


9) खानदेशी शेंगदाणा चटणी
जळगावची शेंगदाणा चटणी ही झटपट होणारी, पण ही लगेच संपवावी लागते. त्याला जळगावची शेंगदाणा चटणी असे म्हटले आहे; कारण जळगावमध्ये ही चटणी लोकप्रिय आहे. ही चटणी गरम गरम भाकरीबरोबर सर्व्ह करतात.
साहित्य : एक कप शेंगदाणे (भाजलेले), 10 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 टेबल स्पून कोथिंबीर, मीठ चवीने
फोडणीसाठी : 1 टेबल स्पून तेल.
कृती : शेंगदाणे भाजून त्याची टरफले काढून घ्यावीत. लसूण व कोथिंबीर चिरून घ्यावी.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरच्या अगदी एक मिनिट परतून घेऊन काढून ठेवाव्यात.
मिक्‍सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ घालून अर्धा मिनिट ग्राइंड करून घ्यावे. मग त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून परत अर्धा मिनिट ग्राइंड करून घ्यावे. ग्राइंड केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यावी व त्यामध्ये मिरची परतून घेतलेले तेल मिक्‍स करून घ्यावे. गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह करावे.


10) गाजराची तिखट चटणी :
गाजराची चटणी चवीला छान आंबट-गोड लागते. या चटणीमध्ये चिंच-गूळ, हिंग, घातला आहे; त्यामुळे त्याची चव उत्कृष्ट लागते. नारळ घातल्यामुळे चटणीची चव अजून चांगली लागते.
साहित्य : चार लाल चुटूक गाजरे (मोठी), 3 हिरव्या मिरच्या (चिरून), पाव कप नारळ, एक टेबल स्पून कोथिंबीर (चिरून)
1 टी स्पून चिंच, पाव टी स्पून हिंग, मीठ चवीने.
कृती :
गाजर धुऊन, किसून घ्यावे. हिरवी मिरची चिरून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. कोथिंबीर चिरून घ्यावी.
किसलेले गाजर, हिरवी मिरची, नारळ, चिंच-गूळ, मीठ, हिंग घालून चटणी वाटून घ्यावी. वाटलेली चटणी बाउलमध्ये काढून घ्यावी. मग त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून मिक्‍स करावे. चपातीबरोबर चटणी सर्व्ह करावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*