जेवणाचा स्वाद वाढविणारी, रुचकर, सुगंधी कोथिंबीर स्वयंपाकात वापरली जाते. अनेक पदार्थाच्या सजावटीसाठीसुद्धा कोथिंबीरीचा वापर केला जातो. कोथिंबीरीचा गंध भूक वाढवितो, मन प्रसन्न करतो. कोथिंबिरीच्या देठांचा उपयोग भाजीच्या रशासाठी करता येतो. याला पांढरी जांभळसर रंगाची छत्रीच्या आकाराची गुच्छामध्ये फुले येतात. कालांतराने त्याचे रूपांतर फळामध्ये होते. यालाच धने असे म्हणतात. या धण्यांचा उपयोग त्याला असणाऱ्या सुगंध व चवीमुळे गरम मसाला करण्यासाठी होतो. तसेच यापासून धण्याची डाळही बनविता येते. मराठीत कोथिंबीर, इंग्रजीमध्ये कोरिएन्डर तर हिंदी मध्ये हरा धनिया तर शास्त्रीय भाषेमध्ये कोरिएन्ड्रम सॅटिव्हम या नावाने ओळखली जाते. कोथिंबीर ही वनस्पती अंबेलिफिरी या कुळातील आहे. कोथिंबीर शीत गुणात्मक, अग्नीदीपक पाचक, तृष्णाशामक मूत्रल आहे. तसेच तिच्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, अ, ब, क जीवनसत्त्व, पोटॅशिअम, प्रथिने, स्निग्धता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. अनेक गुणधर्मामुळे कोथिंबीरीचा आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापर केला जातो.
० रोजच्या जेवणामध्ये ताज्या कोथिंबीरीची चटणी १-२ चमचे खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, अन्नावरील वासना कमी होणे, पोटात गुब्बारा धरणे, अल्सर, मूळव्याध आदी विकार होत नाहीत.
० रोज सकाळी कोथिंबीर पाने १०-१२ व पुदिना पाने ७-८ पाण्यातून उकळून घेतल्यास शरीरातील विषारी घटक शौच व लघवीद्वारे बाहेर पडतात. तसेच शरीरातील वाईट कोलेस्ट्रेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी होण्यास मदत होते.
० डोळ्यांची आग होणे, तसेच डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होणे. डोळे कोरडे होणे, डोळे क्षीण होणे अशा विविध डोळ्यांच्या विकारावर कोथिंबीर उपयोगी आहे. कोथिंबीरीचा ताजा रस काढून त्यात ४-५ चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्यावा व ते पाणी डोळ्यात २-३ थेंब घालावे.
० शरीराराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढविण्यासाठी २ चमचे धणे व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने भूकसुद्धा वाढते.
० अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा यामुळे जुलाब थांबतात.
० आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.
० स्थूलता कमी करण्यासाठी एक चमचा धणे, एक चमचा आवळा पावडर, अर्धा इंच आलं हे मिश्रण पाण्यात उकळून ते पाणी प्यावे.
० हातापायांची उष्णतेमुळे जळजळ होत असेल तर एक चमचा धणे व जिरे रात्री पाण्यात भिजत घालावे व सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये कुस्करून ते पाणी गाळून प्यावे.
० गर्भवती स्त्रियांना अनेक वेळा उलटीचा त्रास होतो. अशा वेळी धणे पूड एक चमचा व १० ग्रॅम खडीसाखर हे पाण्यामध्ये मिसळून ते पाणी थोडय़ा थोडय़ा अंतराने घोट घोट पीत राहावे.
० धणे सुगंधी, दीपक, पाचक, मुखशुद्धीकारक असल्यामुळे बडीशोपमध्ये मिसळून जेवणानंतर खावेत. यामुळे मुखदरुगधी दूर होते व पोटातील गॅस कमी होतो.
० मूत्र प्रवृत्ती होत नसेल व लघवीला आग होत असेल तर अशा वेळी ४ चमचे धणे रात्री ८ ग्लास पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी उकळावे. थंड झाल्यानंतर हे पाणी दिवसभर पीत राहावे. लघवीची जळजळ कमी होऊन मूत्रप्रवृत्ती वाढते.
० खोकल्यावर खात्रीशीर उपाय म्हणून धण्याचा उपयोग केला जातो. धणेपूड, सुंठ व पिपळी चूर्ण समप्रमाणात घेऊन मधातून सकाळ संध्याकाळ चाटण करावे असे केल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नष्ट होतो.
कोथिंबीर वापरताना सावधानता कशी बाळगावी ?
अनेक वेळा धन्याला पटकन कीड लागते. अशा वेळी बाजारातून आणताना कमी प्रमाणात धणे आणून त्याचा वेळीच वापर करावा. कोथिंबीरीचा स्वाद व औषधी उपयोग होण्यासाठी ताज्या कोथिंबीरीचा पदार्थात वापर करावा. फ्रीजमध्ये ठेवलेली अतिशिळी कोथिंबीर वापरू नये. तिचा स्वाद व औषधी गुणधर्म कमी होतात. ताजी कोथिंबीर स्वच्छ धुवून वापरावी. कोथिंबीर न धुता वापरल्यास आजारांची लागण होऊ शकते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही पदार्थ कोथिंबीरीचे
ग्रीन पुलाव
कोथिंबीरीचे वडे
कोथिंबिरीचे समोसे
कोथिंबीर वडी
Leave a Reply