साहित्य: २ कप स्वीट कॉर्न, उकडलेले ३ मध्यम बटाटे, उकडलेले २ ब्रेडचे स्लाईस १ टीस्पून आले, किसलेले ३ हिरव्या मिरच्या, पेस्ट करून २ लहान कांदे १/२ टीस्पून जिरे,
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले १ टेस्पून मैदा + १/२ कप पाणी चवीपुरते मीठ तळण्यासाठी तेल.
कृती: बटाटे सोलून कुस्करून घ्यावे. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे आणि ते बटाट्यात घालावे. दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये अगदी भरड वाटावेत. उरलेले १/२ कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे. मिक्स करून घ्यावे. तयार मिश्रणाचे १८ ते २० मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे बनवावेत. क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे. मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात ३-४ पॅटीस बुडवून लगेच बाहेर काढावेत. आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व पॅटीस बनवावेत. पॅटीस एकावर-एक रचू नयेत. सेपरेट ठेवावीत. अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे. अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून १० मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम आचेवर पॅटीस तळून घ्यावी. जेव्हा पॅटीस तळणीत सोडाल तेव्हा २०-२५ सेकंद त्याला डिस्टर्ब करू नकात. एक बाजू थोडी तळली गेली की मगच झाऱ्याने बाजू बदलावी. दोन्ही बाजू सोनेरी रंगावर तळाव्यात. तळलेले पॅटीस टिश्यू पेपरवर काढावेत. पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.
Leave a Reply