दीप अमावस्येचे गोड दिवे

आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहानपणी खूपच मज्जा येई. वर्षभर प्रकाश देणाऱ्या, घर उजळविणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस. पितळी समई, लामण दिवा, नंदादीप, चांदीची निरांजने इतकेच नव्हे तर कंदील, चिमणी यासारखे घरातील सर्व दिवे लख्ख घासूनपुसून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जात असे. दुसऱ्या दिवसापासून सणवार, व्रतवैकल्ये, उपवास वगैरेंची रेलचेल असणारा श्रावण महिना सुरू होणार असल्याने ती उत्सुकता या दिवशी असायची. पण अजून एक आकर्षण या दिवसाचे खास असायचे ते म्हणजे, नैवेद्यासाठी केलेले कणकेचे ‘गोड दिवे’. येता जाता दिवसभर मनसोक्त खाल्ले जायचे.

साहित्य: १ वाटी जाड दळलेले गव्हाचे पीठ, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, स्वादासाठी चिमुटभर जायफळाची पूड, २ चमचे तुपाचे मोहन.

कृती: प्रथम गूळ विरघळेल एवढेच कमीत कमी पाणी घेऊन गूळपाणी तयार ठेवावे. नंतर गव्हाच्या पिठात २ चमचे गरम तुपाचे मोहन, जायफळ पूड टाकून गूळपाण्यात पीठ घट्ट भिजवून घ्यावे. ही कणिक चांगली मळून घेतल्यावर त्याचे छोटे छोटे दिवे बनवावेत. बनवून झालेले दिवे चाळणीत ओल्या कापडावर ठेवून चांगले १५/२० मिनिटे चांगले वाफवून घ्यावेत. प्रत्येक दिव्यात थोडं साजूक तूप टाकून गरमागरम खावेत. गार झालेले दिवे सुद्धा साजूक तुपासोबत खाण्यास चांगले लागतात. गुळाचे प्रमाण गोडीच्या आवडीनुसार कमी-अधिक करू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*