कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.
आज काही कृती गौरी आगमन व पुजेच्या
शेपूची भाजी
साहित्य:- १ मोठी जुडी शेपू, २-३ हिरव्या मिरच्या ,फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथीदाणे, ८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे, २ टेस्पून भिजवलेली तूर डाळ, १/२ ते ३/४ कप थालीपीठाची भाजणी, २ टिस्पून गूळ (ऐच्छिक), चवीपुरते मीठ.
कृती:- शेपू निवडून घ्यावा. खोल भांड्यात पाणी घ्यावे व स्वच्छ करावा. नंतर चिरून घ्यावा. कुकरच्या डब्यात शेपू व मिरच्या मोडून घालाव्यात. कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून भाजी शिजवावी. भाजीच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर भिजवलेले शेंगदाणे ठेवून तेही शिजवून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालावी. लालसर होईस्तोवर परतावे. मेथीदाणे घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी आणि हळद घालून फोडणी करावी. फोडणीत भिजवलेली तूरडाळ घालून मंद आचेवर वाफ काढावी. डाळ अर्धवट शिजली कि शिजवलेले शेंगदाणे घालावेत. मिनिटभर परतावेत. यात शिजवलेली शेपूची भाजी घालून नीट मिक्स करून घ्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून मिनिटभर शिजवावे. नंतर थालीपीठाची भाजणी पेरून मिक्स करावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. झाकण ठेवून २ वाफा येउ द्याव्यात. भाजी गरमच भाकरी सर्व्ह करावी.
टीप: भाजणीऐवजी ज्वारीचे पीठ किंवा भाजलेले बेसनही वापरू शकतो. भाजणीमुळे चव छान येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
बाजरीची भाकरी
साहित्य:- बाजरीचे पीठ, मीठ, पांढरे तीळ
कृती:- बाजरीचे पीठ व मीठ एकत्र करून पीठ भिजवावे. त्याची भाकरी थापून तव्यावर टाकावी. जरा गरम झाली की पाणी फिरवावे. पाणी सुकले की भाकरी उलटावी. जरावेळाने उलथणे फिरवून पहावे. भाकरी तव्यावरून सुटली की तवा उतरवून गॅसवर शेकावी. छान पदर सुटेल. ही भाकरी पांढरे तीळ लावूनही करता येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply