लवकरच हिरवा हरभरा बाजारात येईल. हिरवेगार हरभरे पाहून मन तृप्त होते. हुरड्याबरोबर शेतातील ताजे सोलाणे शेकोटीवर भाजून खाण्याची मजा तर औरच असते. हरभ-याचा आकार व रंग यावरून त्याचे देशी, काबुली, गुलाबी व हिरवा असे प्रकार आहेत. देशी हरभ-याचा रंग पिवळसर, तपकिरी असून दाणे सुरकुतलेले असतात. यातील काही प्रकार हिरव्या व काळ्या रंगाचेसुद्धा आढळतात. काबुली हरभ-याचा रंग पांढरा व दाण्याचा आकार मोठा असतो. गुलाबी हरभ-याचा रंग फिकट असून दाणे गोल व गुळगुळीत असतात. हिरव्या हरभ-याचा रंग वाळल्यानंतरसुद्धा हिरवा राहतो. हरभरा वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त असून बियात प्रथिने व कार्बोहायड्रेटस् तसेच जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. जेवणामध्ये हरभ-याचा कोवळा पाला, पीठ व डाळ याचा भरपूर उपयोग करतात. हरभ-याच्या कोवळ्या शेंड्याचा (पानांचा) उपयोग भाजीसाठी करतात. फुले येण्याच्या सुमारास हरभ-याच्या पानावर एक प्रकारचे आम्ल तयार होते. पहाटे त्याच्यावर पातळ कापड दीड ते दोन तास पसरून ठेवले की ते दवाने ओले होते व पानावरील आम्ल त्यात उतरते. कापड पिळून आम्ल बाटलीत गोळा करतात, याला आम म्हणतात. हिरवी मिळणारी आम उत्तम औषधी असून त्यामध्ये मॉलिक अॅसिड (९० ते ९५ टक्के) ऑक्झालिक अॅीसिड (५ ते १० टक्के)असतात. ही आम वांत्या (ओकारी), अग्निमांद्य, अपचन, पटकी, अमांश व संधिभंग होते यावर शिजवलेल्या पानांचा लेप अत्यंत गुणकारी असतो. हरभरा हा स्नायूंना बल देणारा आहे. त्यास ‘घोडे का खाना’ असे म्हटले जाते. तरुणांना शरीर कमवायचे असेल तर हरभरा हे स्वस्त आणि मस्त प्रोटिन फुड आहे. हरभ-यातील प्रथिने मिळवायची असल्यास त्यास भाजून किंवा वाफवून घ्यावे. तसेच प्रथिनांची साखळी पूर्ण होण्यासाठी हरभरा हा दही, ताक, पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर खाल्लेला चांगला. हरभ-याची पानं चवीला आंबट, तुरट असून या पानांची भाजी खाल्ल्याने आतडय़ांची स्वच्छता होते. पोट कमी होतं. हिरडय़ांची सूज नाहीशी होते. हरभ-याच्या पानांची भाजी बनवून खाल्ल्याने पित्तज्वर कमी होतो. ओले चणे आणि गूळ खाल्ल्याने आवाज सुरेल होतो. हरभ-याच्या ताज्या पानांत लोह भरपूर असते. म्हणून लोहाच्या कमतरतेमुळे होणा-या रक्त क्षयावर ही पाने अत्यंत चांगली आहेत. या पानांचा चमचाभर रस मधात मिसळून घ्यावा. (सोलाणे म्हणजे हिरवा हरबरा.)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही पदार्थ ओल्या हरभ-याचे (सोलाण्याचे)
सोलाण्यांच्या तिखट करंज्यांची आमटी
साहित्य:- ३ वाट्या सोलाणे (ओले हरभरे), २ मोठे कांदे बारीक चिरून, १२-१५ लसूण पाकळ्या, १ ते दीड इंच आलं, (पेस्ट करा) वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टेबलस्पून डाळीचं पीठ (बेसन), २ टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, हळद. पोळ्यांना भिजवतो तशी पण अगदी घट्ट भिजवलेली कणीक
कृती:– सोलाणे मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या. आता एका कढईत अर्धं तेल गरम करून नेहमीसारखी फोडणी करा. नंतर त्यात कांदा घाला आणि मधून मधून हलवत चांगला होऊ द्या. कांदा शिजला की त्यात आलं-लसणाची पेस्ट घाला. परत चांगलं परता. पेस्टचा कच्चा वास गेला आणि मिश्रण चांगलं परतलं गेलं की त्यात कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घाला. नीट मिसळून घ्या. आता त्यात सोलाण्यांची भरड घाला. नीट हलवून झाकण ठेवून, मधेमधे हलवत ५ मिनिटं शिजू द्या. सोलाणे शिजत आले की त्यात डाळीचं पीठ घाला. हलवून घ्या आणि झाकण ठेवून २-३ मिनिटं शिजू द्या. गॅस बंद करा. हे सारण एका ताटात काढून थंड होऊ द्या. सारणातलं पाऊण वाटी सारण बाजूला ठेवून द्या, आपल्याला ते आमटीत वापरायचं आहे. करंज्या करण्यासाठी अगदी लहानशा लिंबाएवढ्या कणकेची पारी लाटा. त्यात सारण भरा आणि करंजीसारखं दुमडून कडा अगदी घट्ट बंद करा. हवं असल्यास करंजीच्या कातण्यानं कापा. पण आवश्यक नाही. पारी लाटताना थोडी जाडसरच लाटा. अशा सगळ्या करंज्या करून घ्या. बाजूला ठेवा. आता एका मोठ्या पसरट कढईत किंवा पातेल्यात उरलेलं तेल घालून नेहमीसारखी फोडणी करा. फोडणी झाली की त्यात थोडंसं तिखट घाला आणि साधारणपणे दीड लिटर पाणी घाला. पाण्याला अगदी खळखळून उकळी येऊ द्या. पाणी खळाखळा उकळायला लागलं की त्यात हलक्या हातानं करंज्या सोडा. करंज्या सोडल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. सतत हलवू नका. अगदी हलक्या हातानं, उलथन्यानं हलवा म्हणजे करंज्या मोडणार नाहीत. करंज्या अगदी २-३ मिनिटंच शिजवा. आता त्यात बाजूला ठेवलेलं सारण घाला. आमटी २-३ मिनिटं उकळा आणि गॅस बंद करा. सध्याच्या थंडीत ही आमटी नुसतीच सूपसारखी प्यायला अफलातून लागते. पण हवं असल्यास भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सोलाणे घालून वांग्याची रस्साभाजी
साहित्य:- ४-५ लहान वांगी, १ मध्यम आकाराचा कांदा, एक वाटी कोथिंबीर, १ वाटी सोलाणे. १ चमचा धणे पावडर, १ चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, १ डाव तेल, मीठ, फोडणीसाठी हळद-हिंग-मोहरी. वाटणः ३-४ लाल मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, २ टे स्पू तीळ, २ टे स्पूण सुके खोबरे.
कृती:– तीळ, खोबरं कोरडच भाजून वाटणासाठी दिलेले इतर जिन्नस वापरुन कोरडेच वाटून घ्यावे. तिळातल्या तेलाने घट्ट गोळा तयार होतो. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. हरभर्याठचे ताजे घाटे सोलून एक वाटी सोलाणे काढावेत. वांगी धुवून स्वच्छ पुसून नाकं काढून चार खाचा द्याव्यात. पसरट बुडाच्या कढईत तेल गरम करुन वांगी तळून (शॅलो फ्राय) घ्यावीत. त्याच तेलात हळ्द-हिंग-मोहरीची फोडणी करुन तेलात आधी तिखट घालावे आणि मग कांदा परतायला घालावा. कांदा नीट परतला गेला की त्यातच अर्धी कोथिंबीर, वाटण, धणे पावडर, काळा मसाला पण घालावा. छान खरपूस वास सुटेपर्यंत सगळे एकत्र परतावे. मग सोलाणे आणि वांगी घालून मसाला एकसारखा लागेल असे हलवून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे. झाकण घालून अगदी मंद आचेवर एक वाफ काढावी. आता दाटसर रस्सा होइल इतपत कढत पाणी घालावे आणि उकळी काढावी. वरुन उरलेली कोथिंबीर घालावी. वांगी फार गाळ होऊ देऊ नयेत. बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा नुसत्या भाताबरोबर सुद्धा हा रस्सा अप्रतीम लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हरभऱ्याचा कोवळा पाल्याची पालेभाजी
पाल्याला सोलाणे (हिरवे ओले चणे) धरले कि तो पाला जुन होतो आणि भाजी करण्यास अयोग्य होतो. त्यामुळे सोलाणे भरायच्या आधीचा पाला मिळाल्यास पुढील रेसिपी बनवता येईल.
साहित्य: २ कप हरभऱ्याचा कोवळा पाला, १/२ वाटी मटार (ऐच्छिक), १ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, ४ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या तुकडे करून, १ टेस्पून ओला नारळ, चवीपुरते मीठ, १/४ चमचा साखर
कृती: हरभऱ्याचा पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करून त्यात लसणीच्या ठेचलेल्या पाकळ्या घालाव्यात. लसूण लालसर झाली कि मोहोरी, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात मटार घालावेत. आच मंद करून कढईवर झाकण ठेवून मटार अर्धवट शिजू द्यावे. नंतर चिरलेला पाला घालून मध्यम आचेवर भाजी परतावी. भाजी आळली कि नारळ मीठ आणि साखर घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चटपटे सोलाणे
साहित्य:- सोलाणे अर्धा किलो, तेल एक डाव, मीठ चवीपुरते, मिरपूड चवीपुरती, लिंबू अर्धे, कोथिंबीर एक छोटी जुडी
कृती:– हरभरे धुऊन निथळून घ्यावे.नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल तापवावे. धुरावल्यावर मोठ्या ज्योतीवरच हरभरे टाकून चटाचट हालवावे. मीठ घालून सारखे करावे आणि ज्योत बारीक करावी. दुसऱ्या शेगडीवर अर्धी वाटी पाणी गरम करावे. मिरपूड भुरभुरवावी. गरम पाणी घालून ज्योत मोठी करावी. मिनिटाभरातच पाणी आळेल. मग ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. दुसऱ्या शेगडीवर अजून अर्धी वाटी पाणी गरम करावे. पाच मिनिटांनी झाकण उघडून, ज्योत मोठी करून, हरभरे परतावे. मिरपुडीचा दरवळ सुटला नसेल तर अजून थोडी मिरपूड भुरभुरवावी. गरम पाणी घालून ज्योत मोठी करावी. एक मिनिटात ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी झाकण काढावे व ज्योत मोठी करावी. हरभरे लाह्यांसारखे चटचटू लागतील. ज्योत बारीक करावी आणि दोन मिनिटांनी बंद करावी. हरभरे थंड झाल्यावर त्यावर लिंबू पिळावे आणि चिरलेली कोथिंबीर मिसळावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सोलाण्यांची हिरवी चटणी
साहित्य:– एक वाटी सोलाणे, नारळाचा चव अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, दोन (किंवा अधिक) हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ व साखर.
कृती – सोलाणे धुवून घ्यावेत. एका भांड्यात सोलाणे घालून त्यावर तीन-चार चमचे पाणी घालून ते कुकरमध्ये उकडून घ्यावेत. सोलाणे मऊ शिजल्यावर बाहेर काढून थंड होऊ द्यावेत. नंतर बाकीचे सर्व साहित्य व सोलाणे एकत्र करून मिक्सारमधून वाटून घ्यावेत.
(जरूर वाटल्यास वाटताना १-२ चमचे पाणी घालावे.) चटणी बाहेर काढल्यावर एखाद्या छोट्या कढल्यात किंवा पळीत दोन चमचे तेलाची, मोहरी व हिंग घालून फोडणी करावी व ती चटणीवर ओतावी. चमच्याने चटणी ढवळून फोडणी नीट मिसळावी. ही चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास ५-६ दिवस टिकते. सोलाणे उकडल्यामुळे चटणीत एकजीव होतात व त्यांचा उग्र वास जातो. ही चटणी भाकरीबरोबर, धिरड्याशी किंवा ब्रेडला लावून खाता येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सोलाण्याच्या सामोसे
साहित्य:- २ कप हिरवे ताजे हरबरे (सोललेले), १/४ कप ओला नारळ (खोवून), १ टे स्पून पंढरपुरी डाळ्याची पावडर, ३ हिरव्या मिरच्या, १ टी जिरे पूड, मीठ चवीने, १/४ टी स्पून हळद, तूप तळण्यासाठी, पारीसाठी २ कप बारीक रवा, १ टे स्पून तेल, १/४ टी स्पून हळद, मीठ चवीने
कृती : रव्यामध्ये मीठ, हळद व थोडे गरम मोहन घालून मळून घ्या. व बाजूला ठेवा. कढई गरम करून त्यामध्ये सोलणे लालसर रंगावर भाजून घ्या. थंड झाल्यावर वाटून घ्या. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, पंढरपुरी डाळ्याची पावडर, हिरवी मिरची, मीठ, हळद, जिरे पूड घालून सामोस्याचे सारण तयार करून घ्या. भिजवलेले रव्याचे पीठ थोडे कुटून घ्यावे. नंतर त्याचे छोटे लिंबा एव्ह्डे गोळे करून पुरी सारखे लाटून घ्या व त्यामध्ये बनवलेले एक टे स्पून सारण भरून पुरीला समोसा सारखा आकार द्या. कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये समोसे छान कुर कुरीत तळून घ्या. गरम गरम टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सोलाणे पचडी
साहित्य:- १ मुठ कोवळी मेथी – निवडुन बारीक चिरुन, १ गाजर किसुन, १/२ वाटी कोवळॆ सोलाणे, १/२ वाटी किसलेला मुळा, १ लहान टोमॅटो बारीक चिरुन, १ मुठ कोथिंबीर – निवडुन बारीक चिरुन, १ चमचा साखर, १ चमचा दाण्याचे कुट, चवीपुरते मीठ, १/४ लिंबाचा रस , २ लहान मिरच्या उभ्या चिरुन, १ लहान चमचा तेल, फोडणीचे साहित्य.
कृती:- एका लहान कढईत नेहेमीप्रमाणे जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी करुन घ्यावी. त्यातच सोलाणे दाणे घालुन साधारण ३-४ मिनीटे परतावे. बाकी खिसलेल्या / चिरलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करुन त्यात दाण्याचे कुट, मीठ, लिंबु, साखर घालावे. त्यावर तयार केलेली फ़ोडणी घालावी. सगळे नीट मिसळुन घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply