शेपू या भाजीस “आहारीय केरसुणी’ म्हणतात. पोटात अडथळा निर्माण करणाऱ्या वायूचे नि:सरण उत्तम प्रकारे ही भाजी करते. पोटात गॅस होणे, अजीर्ण, क्षुधामांद्य, कृमी अशा अनेक पचनाच्या तक्रारींवर शेपू गुणकारी समजली जाते.
उग्र वासामुळे कुणाला फारशी प्रिय नसणारी ही भाजी खरे तर अतिशय औषधी आहे. बाळंतिणीने शेपूची भाजी खाल्ल्यास बाळाच्या पोटात गॅसेस होत नाहीत, असा समज आहे.
शेपूत अनेक औषधी तेले आहेत. यातील युगेनॉल हे तेल रक्त शर्करा नियंत्रित करते, असे आढळून आले आहे. मधुमेहींना शेपूची भाजी चांगली. शेपूत मेथी व पालकप्रमाणेच “अ’, “क’ जीवनसत्त्वे, फॉलिक ऍसिड व महत्त्वाचे क्षार आहेत. बैठी जीवनशैली असणाऱ्यांसाठी शेपू हितकर आहे. हालचाल कमी असल्याने आतड्यातून वायू सरत नाही, पोट जड वाटणे, अजीर्ण, भुकेची संवेदना कमी होणे, अशा प्रकारची तक्रार असणाऱ्यांनी हिंग-लसूण-जिरे घालून केलेली शेपूची भाजी वरचेवर खावी. निश्चितपणे आराम लाभतो.
१ वाटी शेपूच्या भाजीत ५१ उष्मांक व ३.६ ग्रॅम फॅट्स आहेत. शेपूच्या बिया म्हणजे बाळशेपा.
लहान बाळाना देतात ते ग्राईप वॉटर यापासूनच करतात. या बिया आणि भाजी देखील, वातासाठी उत्तम. या बिया अरब लोकात, मसाल्यात वापरतात. आपल्या नेहमीच्या डोश्याच्या पिठात, शेपू बारीक चिरुन घातला तर तो दिसतोही चांगला आणि लागतोही चांगला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply