आता हळू हळू हुरडा बाजारात दिसायला लागला आहे. हुरडा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात चांगला हुरडा उपलब्ध असतो. रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत कोवळे असतात, त्या वेळेला भाजलेले अतिशय चवदार, मऊ आणि गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन “कॅरमलायझेशन’मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. ज्वारीचे दाणे पूर्ण जून झाल्यानंतर त्याला जोंधळा किंवा ज्वारी म्हणून म्हणतात. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. एखाद्या वीकेंडला भेळ- पिझ्झा-बर्गरऐवजी हुरडा पार्टीचा बेत आखलात, तर छान आउटिंग होईल आणि ज्वारीसारख्या उत्तम हेल्दी फूडचा आस्वादही घेता येईल.
थंडीची आता सुरुवात होत आहे. आई-वडील, आजी-आजोबांकडून त्यांनी हुरडा पार्टीचे किस्से बऱ्याचदा ऐकले असले, तरी प्रत्यक्षात फार कमी जणांनी त्याची गोडी चाखली असेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही हुरडय़ाचे पदार्थ
घरच्या घरी हुरडा पार्टी
साहित्य : २ वाटय़ा कोवळा गोड हुरडा (कोणताही), १ चमचा तूप, मीठ, १/२ चमचा गूळ आणि १ वाटी दही.
चटणीसाठी साहित्य : अर्धी वाटी भाजलेले दाणे, १ चमचा जिरे, १ चमचा तिखट, १ चमचा लसूण, मीठ आणि साखर.
कृती:- चटणीसाठीचं सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरवर किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावं.
तुपात हुरडा भाजून घ्यावा. त्यात मीठ घालून एकत्र करावं. डब्यात वेगवेगळ्या कप्प्यांमधे भाजलेला हुरडा, चटणी, गूळ आणि दही द्यावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हुरडय़ाचं मोकळ(पिठल)
साहित्य : दीड वाटी हुरडा, १ चमचा भाजलेले दाणो, २ मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, १1 चमचा सुक्या खोब:याचा कीस, तेल, मीठ, साखर, फोडणीचं साहित्य, १ छोटा कांदा आणि ताक.
कृती : हुरडा मिक्सरवर अर्धवट बारीक करून घ्यावा. एक चमचा तेलाची हिंग, मोहरी, हळदीची फोडणी करावी. त्यात कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे आणि दाणो परतून घ्यावे. आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा परतला गेला की त्यात वाटलेला हुरडा घालून परतून घ्यावा. थोडा परतला गेला की अर्धी वाटी ताक घालून, ढवळून झाकणं ठेवावं. छान वाफ आली की मीठ, साखर घालून ढवळावं. व्यवस्थित शिजलं की उतरवावं, वरून कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घालून डब्यात द्यावं. सिझनमध्ये हुरडा वाळवून त्याचा रवा काढून ठेवला तर सिझन नसतानाही कधीतरी हुरडय़ाचं मोकळं बनवता येऊ शकेल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हुरडा वडा
साहित्य – दोन ते अडीच वाट्या ताजा कोवळा हुरडा, एक ते सव्वा वाटी भिजलेली हरभराडाळ (काही जण चणाडाळ व मूगडाळ एकत्रित घेतात).
मसाला – आल्याचा मध्यम तुकडा, चार-पाच हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, नावाला थोडा गरम मसाला, लसूण (ऐच्छिक), मीठ, साखर, तळणीसाठी तेल.
कृती – हुरडा, डाळी, सर्व मसाला हे घालून मिक्सयरमधून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यावे. साधारणत- उडीदवड्याच्या पिठाप्रमाणे हे असावं. जरूर वाटल्यास बाइंडिंगसाठी एखादा उकडून रगडलेला बटाटा वा बेसन घालावं. मीठ, साखर, कोथिंबीर (चवीनुसार) घालून त्याचे छोटे छोटे वडे गरम तेलात तळावेत. हे वडे कच्ची पपई, पुदिना, कोथिंबीर, मिरचीच्या आंबट-गोड चटणीबरोबर देतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
हुरडा पॅटिस
हुरडा वड्याप्रमाणे हुरडा वाटून त्यात रगडलेला बटाटा जरुरीप्रमाणे थोडंसं बेसन (ऐच्छिक) घालून भरपूर मनुका, काजू, आलं, मिरची (लसूण, खोबरं ऐच्छिक) याचं वाटण घालून त्यात चवीनुसार मीठ, साखर घालून आपल्याकडच्या उपवासाच्या कचोरीप्रमाणे गोल वळून तळतात. कित्येकदा बटाटा, मैदा यांचं आवरण करून आत वाटलेला हुरडा, मसाला, मनुका, चवीनुसार मीठ, साखर, लिंबू एकत्र करून त्यांचं सारण बनवूनही पॅटिस करतात. अर्थात घरगुती बनवताना घरोघरी गृहिणी आपल्या सवडी-आवडीनुसार व कल्पकतेप्रमाणे त्यात थोडाफार बदल करतात. महाराष्ट्रात हुरड्याबरोबर गूळ, लसणाची चटणी वगैरे खातात. तशी ही मंडळी हुरड्याबरोबर नाना प्रकारची शेव व साखरफुटाणेही खातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply