कोकणात गणपती बसतात तेव्हा काही ठिकाणी खतखते ही भाजी करतात.
खतखते
साहित्य:- अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव,मूठभर शेंगदाणे,चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्या,३-४ आमसुले,दोन अमेरिकन स्वीट कॉर्न, एखादा छोटा बटाटा (छोट्या फोडी करून),एखादे रताळे ( छोट्या फोडी करून),लाल भोपळा (फोडी करून),सिमला भोपळी मिरची (चिरून),काकडी (चिरून),५-६ श्रावणघेवड्याच्या शेंगा (लांब तुकडे करून), दोडका (शिरा काढून व बारीक फोडी करून),अर्धा चमचा हळद,चिमूटभर हिंग व चवीनुसार मीठ आणि साखर, फोडणीसाठी- २ टेबलस्पून तेल,१/२ टीस्पून मोहरी,१/४ टीस्पून हिंग आणि ५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती:- कणसाचे २ १/२” ते ३” लांबीचे तुकडे करून ठेवा. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि चवीनुसार १-२ हिरवी मिरच्या प्रेशर कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.
गॅसवर एका पातेल्यात थोडे पाणी घालून त्यात बाकीच्या सगळ्या भाज्या घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
तुरीची डाळ शिजली की चांगली घोटून घेऊन त्यात वेगळ्या शिजवून घेतलेल्या भाज्या,कणसाचे तुकडे,शिजलेले शेंगदाणे घाला आणि पाणी घालून आपल्याला हवे तेव्हढे पात्तळ करून घ्या. ओल्या नारळाचा चव गरम पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या. डाळ आणि भाज्यांमध्ये हे ओल्या खोबर्याेचे वाटण घालून मिक्स करा. आमसुलं घालून ढवळा. हळद,तिखट आणि चवीनुसार मीठ व साखर घालून ढवळून घ्या. मोठ्या आंचेवर ही रस्सा भाजी ५-१० मिनिटे चांगली उकळत ठेवा. गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करा. तेल चांगले तापले की, मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की, कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग घाला आणि रश्याला ही फोडणी द्या.
मिश्र भाज्यांचे हे अत्यंत पौष्टिक असे खतखतं पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply