पंचखाद्य
साहित्य – १ वाटी भाजलेला खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी भाजलेली खसखस, १ वाटी काजूचे तुकडे, १ वाटी बदामाचे काप, अर्धी वाटी बेदाणे, अर्धी वाटी किसलेला गुळ, १ वाटी पिठी साखर आणि वेलदोडा पावडर.
कृती – खोबरं आणि खसखस थोडी भाजून घ्यावी. वरील सर्व पदार्थ एकत्र करून कालवावे. हे तयार झालेले पंचखाद्य डब्यात भरावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चुरम्याचे लाडु
साहित्य – ४ वाट्या जाडसर दळलेली कणीक, ४ वाट्या पिठीसाखर, कणीक भिजवण्यास लागेल तेवढं दूध, साजूक तूप, मीठ.
कृती – कणिक, चवीपुरतं मीठ, २ डाव तूप घालून दुधात घट्ट भिजवावी. दीड तासानंतर त्याचे लहान तुकडे करून तुपावर मंद तळावे. मुटके गार झाल्यावर मिक्सरमध्ये घालून रव्याप्रमाणे बारीक करावे. वाटीभर तूप घेऊन त्यात साखर घालून फेसावे. नंतर त्यात मुटक्यांचा रवा आणि वेलदोडा घालून सारखे करून लाडू करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मसालेदार स्वीट कॉर्न
साहित्य – अर्धा किलो स्विट कॉर्नचे दाणे, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा गरम मसाला, १ चमचा तूप, चवीपुरतं मीठ, तिखट.
कृती – स्विटकॉर्नचे दाणे चाळणीत घेऊन वाफेवर मऊ शिजवावे. एका बाऊलमध्ये दाणे काढून त्यात चाट मसाला, गरम मसाला, तूप, पाव चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालून ते चांगले कालवावे.
राजगिऱ्याच्या लाह्यांचा चिवडा
साहित्य – पाव किलो राजगिऱ्याच्या लाह्या, ४ सुक्या लाल मिरच्या, १ डाव साजूक तूप, जिरे, ३ चमचे पिठी साखर, चवीप्रमाणे मीठ, ३ पाने कढीपत्ता, हिंग आणि हळद.
कृती – कढईत डावभर तूप घालून त्यात जिरे, लाल मिरच्यांचे तुकडे, हिंग, कढीपत्ता आणि पाव चमचा हळद घालून फोडणी करावी. त्यात लाह्या, पिठी साखर, मीठ घालून मिश्रण मध्यम आचेवर दोन मिनिटं हलवावं. गार झाल्यावर चिवडा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये भरावा. आवडत असल्यास चिवड्यात दाणे व खोबरे तळून घालावेत.
पुरणाचे मोदक
साहित्य – १ वाटी रवा, १ वाटी मैदा, ४ चमचे तूप मोहनासाठी, तयार केलेले पुरण (पुरणाच्या पोळीपेक्षा थोडं कोरडं करावं), दूध आणि तळण्यासाठी तेल.
कृती – रवा मैदा एकत्र करून त्यात चार चमचे तुपाचे मोहन घालून पीठ दुधात घट्ट भिजवावं. हे पीठ दीड तास झाकून ठेवावं. नंतर ते चांगलं कुटून मळून घ्यावं. त्याचे छोटे गोळे करून पुरीप्रमाणे पातळ लाटावे. आत चमचाभर पुरण भरून त्याला मोदकाचा आकार द्यावा. तेलात अथवा तुपात मंद गॅसवर तळावेत.
फ्रुट सॅलड
साहित्य – १ लिटर दूध, डाळींब, पपई, सफरचंद, चिकू, केळं, पेरु, मुठभर काजू, अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर, ४-५ चमचे साखर.
कृती – दूध जाड बुडाच्या पातेल्यात किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये घेऊन निम्मे होईपर्यंत आटवावं किंवा कस्टर्ड पावडर घालून शिजवावं, त्यात ४-५ चमचे साखर, वेलदोड्याची पूड, काजूचे तुकडे घालून मिश्रण गार करावं. सर्व फळं बारीक चिरून घ्यावी. दुधात मिसळून मिश्रण कालवावं अन् ते सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं.
खजूर लाडू
साहित्य – अर्धा किलो खजूर, १ वाटी काजू पावडर आणि दोन चमचे तूप.
कृती – खजुरातील सर्व बिया काढून त्याचे बारीक तुकडे करावे. हे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याचा गोळा होईल इतकं वाटावं. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून कूट करावा. काजूची पावडर करून घ्यावी. खजुराच्या वाटलेल्या गोळ्यात दाण्याचा कूट आणि काजूची पावडर घालून मिश्रण एकत्र करावं. कोरडं वाटल्यास तूप घालावं. लहान आकाराचे लाडू वळावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply