साहित्य – दोन ते अडीच वाटया गव्हाचं पीठ, पाच ते सहा चमचे मैदा, कोथिंबिरीची मध्यम आकाराची जुडी, वाटीभर तेल, आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा, एका लिंबाचा रस, थोडंसं लाल तिखट, हळद, वाटीभर चणाडाळीचं खरपूस भाजलेलं पीठ, थोडीशी आमचूर पावडर, फोडणीसाठी जिरं आणि हिंग, आवडत असल्यास लसणीच्या तीन ते चार पाकळया, चवीपुरतं मीठ.
कृती – कोथिंबिरीची जुडी नीट निवडून, स्वच्छ धुवून, बारीक चिरावी. कढईत अर्धी वाटी तेलावर जिरं, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात चमचाभर आलं-मिरचीचा वाटलेला ठेचा घालावा. आवडत असल्यास लसणीच्या पाकळ्याही ठेचून घालाव्यात. नंतर कोथिंबीर घालून फोडणी परतून घ्यावी. मग एक वाटी डाळीच्या पिठात अर्धी-पाऊण वाटी पाणी घालावं. पीठ पाण्यात व्यवस्थित कालवून, पिठाच्या गुठळ्या फोडून घ्याव्यात. ते मिश्रण फोडणीला घातलेल्या कोथिंबिरीत ओतावं. चवीला मीठ, साखर, आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घालून कढईतील मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. हवं असल्यास त्यात थोडं लाल तिखट घालावं. कढईतील मिश्रणाला एक वाफ येऊ द्यावी. ही कोथिंबिरीची भाजी गार झाल्यावर हाताला मऊ लागली पाहिजे, पण चिकट असता कामा नये. भाजी थोडी झणझणीत झाली तरी चालते. भाजी तयार होईपर्यंत मधल्या वेळात कणकेत मैदा आणि किंचित मीठ घालून पराठयासाठी पीठ मळून घ्यावं. साधारण दीड ते दोन तासांनी कणकेचा तयार गोळा पुन्हा एकदा तेल-पाणी लावून मळून घ्यावा. तो चांगला सैल करावा. त्यात थोडं तेल ओतून झाकून ठेवावं. कणकेच्या गोळयाच्या तिप्पट भाजीचा गोळा घेऊन त्याच उंडा तयार करावा. तो व्यवस्थित लाटून घ्यावा. लाटताना थोडा भाकरीसारखा थापून लाटावा. म्हणजे कडा फुटणार नाहीत. आवडीप्रमाणे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल सोडून पराठा खरपूस भाजावा.
Leave a Reply