उकड साहित्य : २ वाटय़ा तांदळाचे पीठ चाळून घ्यावे, दीड वाटी पाणी, १ वाटी आंब्याचा रस, १ मोठा चमचा रिफाइंड तेल, १ चिमूट मीठ.
सारण साहित्य : १ कोवळा नारळ (अडसर) खवून, ८ चहाचे चमचे साखर, ४ वेलच्यांची पूड, २ मोठे चमचे बेदाणे, अर्धी वाटी दूध.
सारण कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध, नारळ व साखर एकत्र करून गॅसवर ठेवावे. अधूनमधून ढवळत राहावे.
साखर व दूध आटल्यावर, साधारण कोरडे झाल्यावर गॅसवरून उतरवावे. त्यात बेदाणे व वेलचीची पूड घालून ढवळावे.
उकड कृती : एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ व तेल घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पीठ व आंब्याचा रस घालून ढवळावे. झाकण ठेवून चांगली वाफ द्यावी.
ही उकड गरम असतानाच पाणी लावून मळावी. वरील सारण भरून हाताने व साच्याने त्याचे मोदक बनवावे. या मोदकांवर ओला फडका ठेवावा अथवा बाजारात मिळते ती ‘क्लिंग फिल्म’ लावावी.
आयत्या वेळी कुकर अथवा चाळणीवर राहील अशा कोणत्याही पातेल्यात पाणी घालावे. वर चाळणीत राहतील तेवढे (एकावर एक न ठेवता) मोदक ठेवावेत. वर दुसरे पातेले उपडे ठेवावे. (अर्थात मोदक-पात्र वापरणे आदर्शच.) मोदकांना चांगली वाफ द्यावी. सुमारे १० ते १५ मिनिटे असे सगळे मोदक वाफवावे. गरमच वाढावे.
Leave a Reply