मशरूम कॉर्न कटलेट
साहित्य : 2 मोठे कांदे व 100 ग्रॅम मशरूम चिरलेले, 1 वाटी ओल्या मक्याचे दाणे, 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे व ब्रेडचा चुरा, 2 चमचे बदाम काप, 1 मोठा चमचा टोमॅटो कॅचप, बटर, तूप, गरम मसाला, मीठ, मिरेपूड अंदाजे.
कृती : तूप गरम करून कांदे परतून घ्या. ब्रेडचे तुकडे सोडून सर्व साहित्य एका नंतर एक टाकून परतून घ्या. मीठ मिरेपूड टाकून 2 मिनिटे शिजू द्या. थंड झाल्यावर ब्रेडचे तुकडे मिसळा व कटलेटच्या आकाराचे गोल बनवा. अर्धीवाटी कॉर्नफ्लोअर आणि 1/2 वाटी मश्रुम पावडरमध्ये तेल व मीठ टाकून पाण्याने पातळ मिश्रण बनवा. या मिश्रणात कटलेटस बुडवून ब्रेडच्या चुऱ्यात रोल करा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा.
मशरूम आचारी टिक्का
साहित्यः १२-१५ मध्यम आकाराचे बटन मशरूम, १ कांदा चौकोनी चिरुन, १ भोपळी मिरची चौकोनी चिरुन, १ टोमॅटो चौकोनी चिरुन, २-३ चमचे घट्ट दही , १-२ चमचे डाळीचे पीठ ( भाजलेले असेल तर उत्तम.), २ चमचे आलं-लसुण पेस्ट , २ चमचे लोणचे मसाला. १/२ चीज क्युब किसुन, १/२ चमचा कसूरी मेथी, १/२ चमचा साखर, १ चमचा लाल तिखट, मीठ, हळद, तेल बांबु स्क्युअर्स कींवा लोखंडी सळ्या ग्रील करण्यासाठी.
सॅलड साठी :- १ कांदा उभा पातळ चिरुन, १ टोमॅटो उभा पातळ चिरुन, मीठ, तिखट, लिंबूरस
कृती :- प्रथम मशरूम स्वच्छ कापडाने नीट पुसुन घावेत. मश्रुम्स कधीही धुवुन घेउन नयेत त्यांना खुप पाणी सुटतं आणी ते मऊ पडतात.मशरूम ना खुप माती असेल तर एखादा स्वच्छ न वापरलेल्या टूथब्रश ने हलक्या हाताने साफ करुन घ्यावेत.देठ तसेच राहु द्यावेत. कांदा, आणि ढबु मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे करुन घ्यावेत. टोमॅटो च्या मधल्या बिया काढुन त्याचे पण मोठे तुकडे करुन घ्यावेत.
एका बाउल मध्ये दही, डाळीचे पीठ, आलं-लसुण पेस्ट, लोणच्याचा मसाला, कसुरी मेथी, साखर, तिखट, मीठ, हळद, चीज ईत्यादी सर्व मॅरीनेशन चे साहित्य घेउन नीट एकत्र करावे. हे मॅरीनेशन मशरूम, कांदा आणि भोपळी मिरची च्या तुकड्यांना सर्व बाजुनी लागेल असे चोळावे. २०-२५ मिनीट्स फ्रीज मध्ये झाकून ठेवावे. बांबु स्क्युअर्स किंवा लोखंडी सळी वर आधी कांद्याचा तुकडा, मग टोमॅटो तुकडा खुपसुन घ्यावा. मग त्यावर मश्रुम देठाकडुन खुपसावे. मग त्यावर ढबु चा तुकडा खुपसून घ्यावा. मग परत कांदा, टोमॅटो, मश्रुम आणि भोपळी असे अल्टरनेट खुपसुन घ्यावे. आता तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल सोडावे आणि त्यावर या सळ्या/स्क्युअर्स अलगद ठेवावे.गोल गोल फिरवत सगळीकडुन नीट भाजुन घ्यावे.गॅस ची आच मध्यम असावी म्हणजे करपणार नाही व नीट भाजले जातील. तंदुर ईफेक्ट येण्यासाठी डायरेक्ट गॅस च्या फ्लेम वर काही मिनिटे भाजावे. सॅलड साठी दिलेले साहित्य एकत्र करुन सॅलड करुन घ्यावे. गरमगरम मश्रुम टीक्का, सॅलड आणि लिंबाच्या फोडीसोबत सादर करावे.
Leave a Reply