साहित्य:- १/२ कप बारीक चिरलेली मेथी, ४ ते ५ टेस्पून बेसन (गरजेनुसार कमी जास्त करावे), फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, २ ते ३ हिरव्या मिरच्या, ४ पाने कढीपत्ता, ४ मोठ्या लसणीच्या पाकळ्या, जाडसर चिरून, २-३ आमसुलं, चवीपुरते मीठ.
कृती:- कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण फोडणीला घालावी. रंग थोडा लालसर झाला कि मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालाव्यात. नंतर चिरलेली मेथी घालावी. थोडेसे मीठ घालावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर मेथी साधारण ५ ते ७ मिनिटे शिजू द्यावी. जर मेथी कोरडी झाली तर थोडे पाणी घालावे. मेथी शिजली कि त्यात साधारण अडीच कप पाणी घालावे. त्यात आमसुलं घालावीत. नंतर १/२ कप पाणी एका भांड्यात घेउन त्यात साधारण ४ चमचे बेसन मिक्स करावे. गुठळ्या राहू देउ नयेत. बेसन पाण्यात कालवून ठेवावे. कढईतील पाण्याला उकळी आली कि कालवलेले बेसन हळूहळू कढईत घालावे आणि ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पिठले गरजेइतके दाटसर होईस्तोवर बेसनाचे पाणी घालावे. इनकेस, हे मिश्रण संपले आणि पिठले दाट झाले नसेल तर अजून १-२ चमचे पीठ थोड्याशा पाण्यात कालवून पिठल्यात घालावे.
मध्यम आचेवर उकळी येउ द्यावी. पिठले नीट शिजले कि गरम भाताबरोबर सर्व्ह करावे.
टीप: पिठले घट्टसर बनवले तर भाकरीबरोबर छान लागते. भाकरीबरोबर बनवताना पिठले थोडेसे तिखट बनवावे. बेसनाचे पीठ आधी कोरडे भाजून नंतर पिठल्यात वापरले तर पिठल्याला खमंग स्वाद येतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply