मिक्स व्हेज टोस्ट

साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस, २ ते ३ टेस्पून बटर, रूम टेम्परेचर, १/४ कप हिरवी चटणी, कांद्याचे पातळ गोल चकत्या.
मसाला: २ मोठे बटाटे, उकडलेले, ३ टेस्पून हिरवे मटार (फ्रोझन), १/४ कप बारीक चिरलेला कांदा, २ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट.
फोडणीसाठी: १ टीस्पून तेल, चिमूटभर मोहोरी (ऐच्छिक), चिमूटभर हिंग, १/४ टीस्पून हळद, ४ ते ५ कढीपत्ता पाने, बारीक चिरून, दीड टीस्पून आलेलसूण पेस्ट, चवीपुरते मीठ.

कृती: मसाला: बटाटे सोलून मॅश करून घ्यावेत. कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हिरवी मिरची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालून १५ सेकंद परतावे. कांदा घालून परतावे आणि झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे. नंतर मटार घालून झाकण ठेवून मटार शिजू द्यावे. मॅश केलेले बटाटे घालावे. मिक्स करावे आणि झाकण ठेवून २-३ मिनिटे वाफ काढावी. ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर लावावे. बटर लावलेल्या ८ पैकी ४ स्लाईस घेवून त्याला चटणी लावावी. चटणी लावलेल्या ब्रेडवर तयार मसाल्याचा पातळ लेयर लावून घ्यावा. त्यावर कांद्याची एक चकती ठेवावी. वरती बटर लावलेला ब्रेड स्लाईस ठेवून किंचित प्रेस करावे. बाहेरून थोडेसे बटर लावून सॅंडविच टोस्टरमध्ये सॅंडविच टोस्ट करून घ्यावे. जर टोस्टर नसेल तर सॅंडविच तव्यावर भाजावे. भाजताना किंचित दाब देउन दोन्ही बाजू लाईट ब्राऊन होईस्तोवर भाजावे.

गरम सॅंडविच हिरवी चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*