साहित्य – दीड वाटी जाडसर कणीक, अर्धी वाटी बारीक रवा, तांदळाचं अर्धी वाटी पीठ,ज्वारीचं अर्धी वाटी पीठ (ऐच्छिक). यात आवडीप्रमाणे बाजरी वा मक्यावचं थोडंसं पीठ थोडं कमी-अधिक प्रमाणात घेतलं तरी चालतं.
मसाला – चार-पाच हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, लसणाच्या आठ-दहा पाकळ्या (ऐच्छिक), साधारण दीड ते दोन वाट्या तेल.
फोडणीचं साहित्य – थोडेसे तीळ, 300 ते 350 ग्रॅम दुधी भोपळा, मीठ, साखर वगैरे.
कृती – प्रथम सर्व पिठं एकत्र करून त्यात अर्धी ते पाऊण वाटी कडकडीत तेलाचं मोहन घालावं. चवीनुसार मीठ, साखर, वाटलेला हिरवा मसाला व दुधी भोपळा किसून घालावा. सर्व पीठ साधारणत- पोळीच्या पिठाप्रमाणं मळून घ्यावं. त्याचा पापडासाठी करतो तसा रोल करावा अथवा मुटके करून भांड्याला हलका तेलाचा हात पुसून कुकरमधून शिट्टी न लावता 20-25 मिनिटं वाफवून घ्यावेत. थोडं गार झाल्यावर त्याच्या गोल चकत्या कापून घ्याव्यात. मोठ्या कढईत अर्धी ते पाऊण वाटी तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, हिंग, तीळ घालून फोडणी करून त्यावर मुठिया टाकून थोडे परतून लगेच खायला द्यावेत. आवडत असल्यास वरून खोबरं, कोथिंबीर व लिंबू पिळावं. दुधी भोपळ्याप्रमाणेच पालक, मेथी व इतर भाज्यांचेही मुठिया बनवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply