काही काही पदार्थ एव्हरग्रीन असतात. त्यांना ऋतूच्या मर्यादा बांधून ठेवू शकत नाही. ओल्या नारळाच्या करंज्या त्यातल्याच एक. तुम्ही केंव्हाही करा, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, सकाळच्या न्याहरीला, दुपारी जेवणाला, मधल्यावेळच्या खाण्याला किंव्हा रात्री जेवणाला. त्यांची चव खाणाऱ्याच्या जिभेवर आपली आठवण ठेवणार.
साहित्य : दोन ओले नारळ, साखर तीन वाट्या, मिल्क पावडर अर्धी वाटी, घरची ताजी साय, अर्धी वाटी, वेलदोडा पूड एक चमचा, केशर काड्या ८-१०, पारीसाठी – रवा तीन वाट्या, मैदा एक वाटी, मुठवळेपर्यंत तेलाचे मोहन, तळण्यासाठी तेल, चिमूटभर मीठ
कृती : रवा, मैदा, मीठ, तेल घालून लागेल तसं पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यावा. रवा बारीक घ्यावा म्हणजे चांगला भिजतो. चांगला २-३ तास भिजू दयावा. नारळ फोडून खवून घ्यावे. नारळाच्या चवीच्या पाऊण पट साखर घ्यावी. मी करतांना नारळाचा चव चार वाट्या होता, मी ३.५ वाटी साखर घेतली. त्यात मिल्कपावडर घालून मिश्रण जडबुडाच्या / नॉनस्टिक भांड्यात आटवत ठेवावे। मिश्रण कढईच्या बाजूपासून सुटू लागून, कोरडे व्हायला लागले की गॅस बंद करावा. गार हाऊ द्यावे. भिजलेल्या रव्याच्या पारीमध्ये तयार सारण घालून करंज्या गरम तुपात मंद आचेवर तळून घ्याव्या.
काही टिप्स
१. ह्या सारणात गुलकंद घालून मस्त आणि वेगळ्या चवीच्या करंज्या करता येतात. फक्त त्यावेळी साखरेचे प्रमाण निम्मं करावं.
२. मिल्क पावडर ऐवजी, मिल्क मेड टाकून पण सारण करता येईल. अश्यावेळी साखर अगदीच कमी घालावी.
३. छान पापुद्री सुटण्यासाठी, तूप आणि मैदा ह्याचे साट तयार करून घ्यावे. मोठी पोळी लाटून, त्यावर हे साट पसरून त्याचा रोल करावा. छोट्या छोट्या गोळ्या कराव्या. आणि पारी लाटून सारण भरून करंजी करावी. आणि तळून घ्यावी. मस्त खुसखुशीत पारी होईल.
भेटू परत, तोपर्यंत,
स्वस्थ राहा आणि त्यासाठी मस्त मस्त खा.
सोनाली तेलंग
२८/०८/२०१८
Leave a Reply