साहित्य : पाणीपुरीच्या पुर्या एक पाकिट (सुमारे ५० पुर्या) मीठ घालून उकडलेले पांढरे वाटाणे २ वाटया, ८-१० वाटया भरून चिंचेचे पाणी (कृती खाली दिली आहे.)
कृती : एका प्लेटमध्ये पुर्या घेऊन त्याला हाताने वरून फोडा. त्यात एक चमचाभर पांढरे वाटाणे घाला. पाणी एका वेगळया वाटीत घ्या. जो तो आपापल्या पुर्यांमध्ये पाणी घालून पुर्या खाईल.
पाणीपुरीचे पाणी –
साहित्य : अर्धी वाटी चिंच उकळून, कोळून त्याचा गर, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, १५ काडया पुदिना, एक वाटी धुवून चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, ५ लवंगा, ६-७ काळे मिरे, शेंदेलोण-पादेलोण यांची एकत्रित पूड, ३ चहाचे चमचे भरून, ४-५ चमचे गूळ, अर्धा चमचा लाल तिखट.
कृती : यासाठी तुम्हाला आई किंवा काकूची मदत लागणार आहे. तुम्ही आईकडून चिंच उकळून घेऊ शकता. मग ती गार झाली की हाताने चोळून तिचा सर्व गर काढायचा. नंतर आईकडून लवंगा तव्यावर किंवा कढईत भाजून घ्यायच्या. त्या भाजतांना धुर निघू लागतो व लवंगा फुगतात आणि काळया होतात. पुदिना धुवून घेऊन त्याची पाने बाजूला काढा व मिरच्यांचे बारीक तुकडे करा. आले किसून घ्या, एका ताटात कोथिंबीरख् पुदिन्याची पाने, मिरचीचे तुकडे, काळी मिरी, जिरे, भाजलेल्या लवंगा, २ चमचे शेंदेलोण-पादेंलोण पूड, आले हे सर्व घेऊन एकत्र कालवा व आईकडून मिक्सरमध्ये एकदम बारीक गुळगुळीत चटणी वाटून घ्या. आता ही चटणी साधारण मध्यम आकाराच्या पातेलीभर पाण्यात (सुमारे १ लिटर पाण्यात) मिसळा, त्यात गूळ घाला व हलवा. झाले पाणी तयार, चव घेऊन पहा, मीठ कमी वाटत असेल तर उरलेली एक चमचा शेंदेलोण-पादेलोण पूड या पाण्यात मिसळा. अजून तिखट पाणी हवे असेल तर अर्धा चमचा तिखट त्यात घालून सर्व नीट ढवळा.
Leave a Reply