साहित्य : २ मध्यम कांदे ( बारीक चिरून ), ३ मोठे टोमॅटो ( बारीक चिरून ), १ टोमॅटोची प्युरी, २ मध्यम बटाटे ( उकडून ), २ टिस्पून मिरची, आले, लसूण पेस्ट (२ हिरव्या मिरच्या + ५ लसूण पाकळ्या + १/२ इंच आल्याचा तुकडा), १/४ कप फ्लॉवर ( वाफवलेला ), १/४ कप मटार ( वाफवलेले ), १/४ कप भोपळी मिरची ( एकदम बारीक चिरून ), १/४ कप गाजर ( बारीक चिरून वाफवून घ्यावे ).
मसाले : १/२ टिस्पून आमचूर पावडर, २ टिस्पून लाल तिखट, १/८ टिस्पून मिरपूड, १ टिस्पून धणेपूड, १/२ टिस्पून गरम मसाला, १ टिस्पून पावभाजी मसाला
३ टिस्पून बटर, १ टिस्पून तेल, चवीपुरते मीठ.
सजावटीसाठी : बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, लिंबाच्या फोडी.
कृती : कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा अर्धवट परतला कि आले-लसूण-मिरची पेस्ट घालावी.
कांदा नीट परतला कि त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मध्यम आचेवर टोमॅटो एकदम मऊ होईस्तोवर शिजू द्यावा. टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर २ ते ४ मिनीटे उकळी काढावी. मिश्रण खुप घट्ट झाले तर थोडे पाणी घालावे.
यामध्ये आमचुर पावडर, लाल तिखट, मिरपूड, धणेपूड, गरम मसाला, चवीपुरते मीठ आणि थोडा पावभाजी मसाला घालून मिक्स करावे.
यामध्ये अर्धवट मॅश केलेले फ्लॉवर, गाजर आणि मटार घालावे. १ टिस्पून बटर आणि उरलेला पावभाजी मसाला घालावा. उकडलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घालावे.
पाणी घालावे, ढवळावे. बारीक चिरलेली भोपळी मिरची घालावी.
गरजेनुसार मीठ-मसाला घालावा. मध्यम आचेवर ८ ते १० मिनीटे शिजू द्यावे.
गरमागरम पावभाजी मसालापाव बरोबर सर्व्ह करावी. सर्व्ह करताना भाजीवर बटर, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा.
Leave a Reply