साहित्य:- अर्धा किलो हरभरा डाळ, पाव किलो गूळ, पाव किलो साखर, एक चमचा वेलची पूड, एक चमचा जायफळ पूड, चिमूटभर मीठ, मैद्याच्या चाळणीने चाळलेली कणीक दीड वाटी, पाव वाटी मैदा, लाटायला तांदूळ पिठी, अर्धी वाटी तेल.
कृती:- हरभरा डाळ धुऊन स्वच्छ करून मऊ शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर चाळणीवर ओतून निथळून घ्यावी. त्यात गूळ, साखर घालून जाड कढईत पुन्हा चटका द्यावा.
शिजताना मिश्रण सतत हलवत राहावे. सुरवातीला पातळ असलेले मिश्रण नंतर घट्ट होईल. चांगले घट्ट झाले म्हणजे त्यात उलथणे सरळ घट्ट उभे राहिल. गरम असतानाच पुरण यंत्रातून बारीक जाळी लावून पुरण वाटून घ्यावे. त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड घालून मिश्रण बाजूला ठेवावे. परातीत मैदा, कणीक व मीठ घालून पीठ भिजवावे. थोडे थोडे तेल घालून कणीक चांगली मळून घ्यावी. पुरणपोळीची कणीक नेहमी इतर कणकेपेक्षा सैल असते. थोडा वेळ कणीक झाकून ठेवावी. नंतर हातावर कणकेचा लिंबाएवढा गोळा करून त्याचा खोल उंडा करावा. त्यात कणकेच्या दीडपट पुरण भरावे. तोंड बंद करून पिठीवर हलक्यार हाताने लाटावे. नॉनस्टिक किंवा बीडाच्या तव्यावर पोळी भाजावी. सारखी पोळी उलटू नये. दुसरी पोळी टाकण्यापूर्वी तवा पुसून घ्यावा. काही ठिकाणी पोळी करताना फक्त गूळच वापरतात. साखरेमुळे पुरणाला किंचित चकाकी येते, तर गुळामुळे पुरण खमंग लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
छायाचित्र सौजन्य : मरुधन फूड्स, अमृता कर्णिक फोटोग्राफी
Leave a Reply