आज एक आगळी वेगळी डिश.
रवा म्हटलं की सामान्यत: बऱ्याच लोकांची परिसीमा ही शीरा, उपमा इतपतच असते. पण हाच रवा ‘कवा कवा’ असंही रूप धारण करू शकतो..
ही डिश आहे मटार आणि रव्याचे देशी मोमोज…
ते ही तेलाचा थेंबभरही वापर न करता. ही डिश काहीजणांना ठाऊक नसेल तर काहींना ठाऊक असेलही. ज्यांना ठाऊक नाहीयं त्यांच्या सेवेत हा एक छोटासा प्रयत्न. बघा जमलाय का !!
कृती :
एका बाऊलमधे वाटीदीडवाटी रवा घेऊन तो भिजेल इतपतच पाणी टाकून, मळून ५/७ मिनिटासाठी झाकून ठेवा.
मिक्सरमधे अर्धी वाटी ओले मटार, इंचभर आले, २/३ हि. मिरच्या, ३/४ लसूण पाकळ्या ग्राईंड करून घ्याव्यात. ही पेस्ट एका बाऊलमधे घेऊन त्यात मीठ, हिंग व जिरे टाकून पेस्ट एकजीव करावी. हे झाले आपले स्टफींग तयार.
नंतर रव्याचे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. त्याचा लिंबाएवढा गोळा करून तो पुरीच्या आकाराचा लाटून, त्यात मटारचे स्टफींग भरावे व चारीबाजूने बंद करून हलक्या हाताने दाबून घ्यावे.
दुसरीकडे पँनमधे पाणी उकळत ठेवावे व या पाण्यात वरील स्टफींग भरलेले मोमोज अलगद सोडावेत. ४/५ मिनिटाने त्याची दुसरी बाजूही तेवढ्याच वेळेसाठी शिजवावी. मग हे मोमोज एका डिशमधे काढून मधोमध कापावेत. वरून अगदी प्रेमाने कुटलेली काळी मिरी शिंपडावी. केचअप याचा जोडीदार असेल बरं !!
आपले इंडीयन रवा मटार मोमोज मग खायला तयार..
Leave a Reply