गौरी गणपतीची आरास, त्यांची मिरवणूक,गणपतीसाठी केले जाणारे गोडधोडाचे पदार्थ यांना जसे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी घराघरात केल्या जाणाऱ्या ऋषीच्या भाजीचेही. हा दिवस साजरा करण्यामागे किंवा हि भाजी तयार करण्यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. वेगवेगळ्या गुणांनी युक्त अश्या भाज्यांचा आस्वाद घेता यावा,त्यातून चव आणि पौष्टिक आहार अश्या दोन्ही गोष्टी साधता याव्यात हादेखील हेतू असतो.
या दिवशी बैलाच्या श्रमातून तयार झालेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन या दिवशी करू नये असे संकेत आहेत.वर्षभर बैलांकडून माणूस श्रम करून घेत असतो,या दिवसाच्या निमित्ताने आपल्या परसात पिकवलेल्या भाज्यांचा समावेश करून हि भाजी तयार करणे हा यामागचा खरा उद्देश. अर्थात शहरात हे शक़्य नाही म्हणून भाज्या विकत आणून त्यापासून ऋषीची भाजी तयार करतात.
साहित्य.
भाज्या: लाल भोपळा,पावसाळी काकडी,दोडके,भेंडी, कंदमुळे किंवा सुरण,रताळी,लाल माठाचे देठ,अळू, मक्याची कणसे,ओल्या वाटण्याचे दाणे,भुईमुगाचे दाणे,चवळीच्या कोवळ्या शेंगा,पडवळ,हिरव्या मिरच्या.
सोबत खोवलेला नारळ, मिरपूड, मीठ, कोळलेली चिंच यांचाही समावेश करावा.
कृती:
भोपळा,काकडी,दोडके,दुधी, अश्या लवकर शिजू शकणाऱ्या भाज्यांचे मोठे काप व शिजायला वेळ लागणाऱ्या भाज्यांचे लहान कांप करा. पानांचे बारीक तुकडे तर माठ तसेच अळूच्या देठांचे लांब तुकडे पाडा. भेंडी वगळता इतर भाज्या मोठ्या पातेल्यामध्ये घालून त्या बुडतील एवढे उकळते पाणी ठेवा व कमी आचेवर शिजायला ठेवा. सुरण,रताळे किंवा कंदाच्या फोडी मऊ झाल्यावर त्यात मीठ,मिरपूड,नारळ,चिंचेचा कोळ टाका व नंतर भेंडीही चिरून घाला. थोडावेळ उकळल्यानंतर भाजी तयार होईल. हि वऱ्याच्या तांदळा बरोबर व दही यासोबत खाता येते.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२२३०१७३३
नमस्कार.
– छान लेख.
– मला आठवतें की माझ्या लहानपणीं, आई नेहमी ‘ऋषींची भाजी’ करत असे.
– या भाजीबद्दल एका शब्दात सांगायचें म्हणजे ‘सात्विक’
– पूर्वी ऋषिमुनि स्वत: खपून ( किवा शिष्यांकडून) अशी पिके पिकवत असत, म्हणून ही ‘ऋषींची भाजी’
– स्वत: पिकवलेल्या भाजीची चव ‘जास्त गोड’ असते हा एक भाग तर झालाच ; पण आपण स्वत: काम केल्यानें आपल्याला बैलांच्या श्रमांची खरी किंमत कळते, हेही तितकेच महत्वाचें आहे.
– असा अनेक विचारांनी या सणाचा समावेश झाला असावा.
सस्नेह,
सुभाष स. नाईक