स्प्रिंग रोल शीट्स व स्प्रिंग रोल
साहित्य: १ कप मैदा, १ टेस्पून साबुदाणा पीठ किंवा कॉर्न स्टार्च, १ टीस्पून तेल, १/२ टीस्पून मीठ, १/२ कप आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्च.
कृती: मैदा आणि १ चमचा कॉर्न स्टार्च, तेल, आणि मीठ एकत्र करावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. १ तास झाकून ठेवावे. मळलेल्या पीठाचे १८ ते २० लहान गोळे करावे. आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्चवर एकदम पातळ पोळ्या लाटाव्यात. तवा अगदी मंद आचेवर तापवावा. लाटलेल्या पोळ्या तव्यावर अगदी कच्च्या भाजाव्यात (प्रत्येक बाजू ५ सेकंद भाजावी). आपल्याला पोळी जास्त भाजलेली नकोय. जास्त भाजली गेली तर रोल वळता येणार नाहीत. तयार रॅपर्स प्लेटमध्ये ठेवून वर टॉवेल ठेवावा. अशाप्रकारे रॅपर्स कच्चे भाजून घ्यावेत. रॅपर्स त्याच दिवशी वापरावेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील ओलसरपणा कमी होतो आणि तुकडे पडतात.
स्प्रिंग रोल्स
साहित्य: स्प्रिंग रोल शीट्स, ३/४ कप कोबीचे पातळ काप, १/२ कप गाजराचे पातळ काप, १/४ कप पातीकांद्याचे पातळ काप, १/२ कप फरसबी, पातळ तिरके काप, १ मध्यम भोपळी मिरची, पातळ उभे काप, १/२ कप शिजलेल्या नुडल्स, २ टीस्पून लसूण, बारीक चिरून
१ टीस्पून आले, बारीक चिरून, २ टीस्पून सोया सॉस, १ टेस्पून तेल, १/४ ते १/२ टिस्पून अजिनोमोटो, १/४ टीस्पून मिरपूड, २ कप तेल स्प्रिंगरोल तळण्यासाठी, चवीपुरते मीठ.
कृती: कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण परतावे. फरसबी, पाती कांदा, गाजर, आणि भोपळी मिरची घालून साधारण ३० सेकंद मोठ्या आचेवर परतावे. सोय सॉस घालावा आणि मिक्स करावे.
नंतर मीठ, मिरपूड आणि कोबी घालून ३० सेकंद ढवळावे. आच बंद करून नूडल्स घालून मिक्स करावे. सारण एका बोलमध्ये काढून ठेवावे. एक स्प्रिंगरोल शीट घेउन त्याच्या एका कडेला १ चमचा सारण ठेवावे. २ वेळा रोल करून डावी आणि उजवी बाजू आत फोल्ड करावी. पुढे रोल करत न्यावी. शेवटी पाण्याने किंवा मैदा+पाण्याच्या पेस्टने कड चिकटवून टाकावे. अशाप्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवावे. तेल गरम करून मध्यम आचेवर रोल तळावेत.
स्प्रिंग रोल्स गरमच चिली सॉस बरोबर सर्व्ह करावे.
टीप: स्प्रिंग रोल्स शीट विकतही मिळतात. यामुळे वेळ वाचेल. तसेच विकतच्या शीट्समुळे स्प्रिंग रोल्स जास्त कुरकुरीत होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply