मलाई कोफ्त्याला लागणारी स्वीट ग्रेव्ही

साहित्य : काजू+खसखस+तिळ+टरबूज मगज यांचं समप्रमाणातलं मिश्रण एक वाटी, पाव वाटी खवा,साखर,वेलदोणा पूड,मीरेपूड,दालचीनी पूड,जीरे,दुध,फ्रेश क्रीम,बटर,साखर,किसमीस,पायनॅपल टीटबीट्स.

कृती: ही गोड ( गोडसर ) ग्रेव्ही आहे. नट्स चं मिश्रण दिड तास स्वच्छ पाण्यात भिजत ठेवा. नट्स पुर्ण भिजल्यावर पाणी काढून गरज पडलीच तर थोडंसं दुध आणि खवा टाकून अगदी बारीक क्रश करुन घ्या. कणी रहायला नको हे पहा नाहीतर ग्रेव्ही अगदी हवी तशी होणार नाही.

भांड्यात बटर टाकून पुरेसं गरम होऊ द्या. आंच जेमतेम मध्यम असावी नाहीतर बटर करपून त्याचा वास स्वीट ग्रेव्हीला लागेल. फोडणीत जीरे थोडेसे भरडून टाका, आणि लगेच नट्स ची पेस्ट टाका. मुळीच न थांबता सतत एक दोन मिनिटं हलवा, पेस्ट तळाला लगेच चिकटते त्याकडे लक्ष ठेवा. चिकटली तर त्याच्या करपट गुठळ्या होऊन मुळ ग्रेव्हीचा टॊन बदलेल ती प्रोफेशनल वाटणार नाही. आता यात चार कप दुध टाका आणि एकजीव मिश्रण होऊ द्या. मुळीच न कंटाळता हे हलवत रहायचे आहे. ग्रेव्ही घट्ट व्हायला लागली की त्यात जेमतेम पाव टीस्पून वेलदोण्याची पुड, पाच ते सहा चमचे साखर, अर्धा चमचा मीरेपूड टाका. ग्रेव्ही शीजू द्या…. बुडबुडे येत थेंब वर उडायला लागले की थोड्याश्या दुधात दालचीनी पूड मिक्स करुन या ग्रेव्हीत सर्वत्र टाका, मिक्स करा. दोन तीन मिनिटात ग्रेव्ही तयार झालेली असेल. आता यात किसमीस आणी थोडेसे पायनॅपल टीटबीट्स ( अननसाचे तुकडे ) टाका.

कोफ्त्याबरोबर सर्व्ह करतांना यात थोडेसे फ्रेश क्रीम टाकून सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*