मोहनथाळ
साहित्य:
एक वाटी शीग लावून रवाळ बेसन (लाडू बेसन) पीठ, 1 सापट वाटी साखर, अर्धी वाटी तूप, पाव वाटी दुध, पावा वाटी काजू-बदामाचे काप, चमचाभर चारोळ्या, 5 वेलदोड्यांची पूड+4-5 केशर काड्या वाटाव्या.
कृती:
दोन चमचे तूप गरम करावे. थाळीत बेसनपीठ घेऊन त्यात ते घालून पीठाला चोळून घ्यावे. नंतर पाव वाटी दुध त्या पीठावर शिंपून एकसारखे करुन अर्धातास ठेवावे. वरचेवर 2-3 वेळा हात फिरवून पीठ मोकळे करावे. कोरडे झाल्यावर चाळणीने (जाड पीठाच्या) ते चाळून घ्यावे. एका कढईत तूप गरम करावे. त्यात बेसन घालून खरपूस भाजावे. एकीकडे साखर बुडेल एवढे पाणी घालून भांड्यात पाक करायला ठेवावा. एकतारी पाक झाला की त्यातच केशर वेलदोड्याची पूड घालून गॅस बंद करावा. भाजलेल्या बेसनात काजू बदामाचे निम्मे काप घालून त्यावर पाक ओतावा. कलथ्याने ढवळून गार करावे. (बेसन भाजल्यावर गॅस बंद करावा) एका थाळ्याला तूप लावून त्यात वरील मिश्रण ओतावे. वरुन चारोळ्या व काजु बदामाचे उरलेले काप पसरुन हलकेच थाळा हलवून घट्ट होईपर्यंत तसेच राहू द्यावे. निदान 3-4 तास घट्ट झाल्यावर सुरीने वड्या पाडाव्या. मिश्रणाचा थर पेरभर जाडीचा असावा. ह्या वड्या जेवढ्या मुरतील तेव्हढ्या छान लागतात. 7-8 दिवस टिकतात. (बर्फी सारख्या लागतात.)
ता.क. हा गुजराती पदार्थ असून खास पक्वान्न आहे.
खरवसाच्या वड्या (चिकाच्या)
साहित्य:
एक वाटी चिकाचे दुध, एक वाटी खोवलेले ओले खोबरे, दीड वाडी साखर, अर्धी वाटी पिठीसाखर, 4-5 वेलदोड्याचे दाणे व 4-5 केशर काड्या कुटून पुड.
कृती:
चिकाचे दुध कुकरमध्ये ठेवून शिटी न लावता शिजवून घ्यावे. (वाटीवर झाकण ठेवावे) बाहेर काढल्यावर गार झाले की वाटीतून सुरीने सोडवून घ्यावे. रबरासारखा गठ्ठा होतो. गार झाल्यावर किसणीने किसुन घ्यावे. ओले खोबरे व साखर एकत्र करुन कढईत गरम करावे. साखर विरघळली की जरा घट्ट झाल्यावर त्यात वेलदोडा-केशराची पुड घालून किसलेला चिक घालावा व परतावे. जरा घट्ट होत आल्यावर गॅस बंद करुन त्यात पिठीसाखर मिसळावी. थाळ्याला तूप लावावे. वाटीच्या बुडाला बाहेरुन तुपाचा हात लावावा. मिश्रण थाळ्यात ओतावे. वाटीने भराभर थापावे, थोडे गार झाल्यावर वड्या कापाव्यात. या वड्या बरेच दिवस टिकतात.
शाही गुलाब जामुन
साहित्य:
एक वाटी शीग लावून खवा, एक सपाट वाडी बारीक रवा, 1 चमचाभर दाणेदार खडीसाखर, 2 वाट्या साखर, 5-6 वेलदोडे व 5-6 केशर काड्यांची पूड, हरबऱ्याच्या डाळीएवढा खाण्याचा सोडा, 1 चमचा गुलकंद, चिमुटभर कोको पावडर, तळण्यासाठी तेल (शेंगदाण्याचे शक्यतो), दुध मसाला.
कृती:
खवा, रवा, सोडा व कोको पावडर, चिमुटभर केशर, वेलदोड्याची पुड हे सर्व एकत्र मळून कणके सारखा गोळा करावा. 15 मिनिटे झाकून ठेवावा. एका वाटीत गुलकंद घेऊन त्यात थोडे पाणी घालावे. पसरट भांड्यात साखरेचा कच्चा पाक करावा. त्यात वेलदोडा-केशराची पूड घालावी. गुलकंद हाताने पाण्यात कुस्करुन गाळुन ते पाणी पाकात घालावे. मळलेल्या लांबटगोल आकाराचे लहान लहान बोराएवढे गोळे करावे. प्रत्येक गोळ्यात खडी साखरेचा एक दाणा घालावा. सर्व गुलाबजाम वळून झाले की ओल्या रुमालाने झाकावे. कढईत तेल गरम करावे. व एकावेळी 10-12 गुलाबजाम तेलात घालून गुलाबी रंगावर तळावेत. चांगले फुलले व फिकट चॉकलेटी झाले की ताटलीत काढून मग पाकात टाकावे. चांगले मुरु द्यावे. सर्व्ह करताना डीशमध्ये 4-5 गुलाबजाम ठेऊन वर दुधमसाला चिमुटभर भुरभुरावा. गुलाबाच्या वासाचे, जांभळाच्या आकाराचे असे हे “गुलाबजामुन’ सर्वांनाच आवडतील. हा बंगाली पदार्थ आहे. (मुळचा)
शाही शिरा
साहित्य:
एक वाटी जाड रवा, पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी तूप, 3।। वाट्या दुध, अर्धे केळे, 1 टेबलस्पून बेदाणे, चमचाभर खसखस, टेबलस्पून बदामाचे तुकडे, अर्धी वाटी गरमपाणी.
कृती: अर्धे केळे कुस्करुन 1 वाटी दुधात घालून मिक्सरवर शेक करावा. कढईत तूप गरम करुन रवा गुलाबी रंगावर भाजावा. भाजत आल्यावर त्यात खसखस, बेदाणे व बदामाचे तुकडे घालनू हलवावे. लगेच त्यात केळ्याचा शेक घालावा. ढवळून दुध (गरम केलेले) व अर्धी वाटी पाणी घालावे. जरा हलवून घट्ट झाले की साखर घालावी. साखर विरघळून घट्ट होत आले (मिश्रण) की कडेने 2 चमचे तूप सोडावे. कलथ्याने हलवावे व गॅस मंद करुन 2-3 मिनिटे वाफ द्यावी. पुन्हा एकदा हलवून झाकण ठेवावे. एखादा मिनीटाने गॅस बंद करावा. सत्य-नारायणाच्या प्रसादासारखा हा शिरा होतो. फ्रीजबाहेर सुद्धा 2 दिवस टिकतो. 6-7 माणसांना पुरेसा होतो.
गुळाच्या पोळ्या
साहित्य –
अर्धआ कि. कोल्हापुरी गुळ, पाऊण वाटी बेसनपीठ, अर्धी वाटी किसलेले खोबरे, अर्धी वाटी तीळ, 2 चमचे खसखस, 4-5 वेलदोड्याची पुड, अर्धी वाटी तांदुळपिठी, अर्धी वाटी तेल, 2 वाट्या कणीक, 1 वाटी मैदा.
कृती –
सर्वप्रथम गुळ किसणीवर किसून घ्यावा किंवा कुकरमध्ये बंद डब्यात ठेवून गरम (मऊ) करुन घ्यावा. खोबरे, खसखस व तीळ भाजून त्याचे कुट मिक्सरमध्ये करुन घ्यावे. तेल कडकडीत तापवून कढईत तापवून कढईत बेसनपीठ तेल सुटेपर्यंत खरपूस भाजावे. गॅस बंद करुन खोबरे , खसखस, तिळाचे कुट त्यात मिसळावे. हे सर्व गरम असताना किसलेला गुळ त्यात घालून सर्व मिश्रण मळून घ्यावे. थोडावेळ झाकून ठेवून एकीकडे कणीक व मैदा एकत्र करुन गरम तेलाचे मोहन घालून घट्ट भिजवावे. गुळाच्या साधारण पोळीच्या लाट्याएवढ्या लाट्या करुन डब्यात झाकून ठेवाव्या. कणकेच्या पेढ्याएवढ्या लाट्या कराव्यात.. दोन लाट्यंची पारी करुन गुळाची लाटी हाताने दाबून त्या दोन पाऱ्यांत ठेवावी व पुन्हा तळहातावर दाबून पोळपाटावर तांदुळपिठी व कणीक एकत्र करुन भुरभुरावी. हलक्या हाताने पोळी लाटावी. एकीकडे सपाट तवा गरम करावा. (अगोदर तेलाचा हात लावावा.) तवा तापला की अलगद पोळी त्यावर टाकावी. लाकडी उलथण्याने भाजत आल्यावर उलथने आरपार घालून संपूर्ण उलटावी. मोठ्या ताटात पेपर पसरुन त्यावर भाजुन झाली की ठेवावी. सर्व पोळ्या सुट्या सुट्या ठेवाव्या. गार झाल्याकी एकावर एक ठेवाव्या. ताटात वाढताना त्यावर भरपूर तूप वाढावे. या पोळ्या खूप दिवस टिकतात. प्रवासात नेण्यास योग्य असतात. अर्धा किलो गुळाच्या साधारणपणे 18 ते 20 पोळ्या होतात.
कंसार
साहित्य –
एक वाटी मध्यम जाड रवा, पाऊण वाटी साखर किंवा गुळ, 4-5 वेलदोड्यांची पुड, 2।। वाट्या पाणी. पाऊण वाटी तूप, अर्धी वाटी पिठी साखर.
कृती –
पाव वाटी तूप रव्याला लावून तो कढईत साधारण भाजून घ्यावा. एकीकडे 2।। वाट्या पाण्यात साखर किंवा गुळ विरघळवून कच्चा पाक करावा. तो रव्यात ओतून लाकडी कलथ्याने चांगले ढवळावे. घट्ट होत आल्यावर गरम तव्यावर कढई ठेऊन मंद वाफ द्यावी. कडेने थोडेसे तूप सोडून वेलदोडा पुड घालावी. पुन्हा एक वाफ द्यावी. गॅस बंद झाकुन ठेवावे. पानात वाढल्यावर जेवणाऱ्याला मध्ये घळगा करायला सांगावा. हवी तेवढी पिठीसाखर व तूप घालून कालवून खावे. तूप पातळ करुन एका वाटीत, एका वाटीत पिठीसाखर असे पानापाशी ठेवतात. ज्याने त्याने आवडीप्रमाणे ते वाढलेल्या कंसारात घालून घ्यावे.
ता.क. गुजरातमध्ये लग्नात केले जाणारे हे पक्वान्न आहे. सर्वांना परवड्याजोगे आहे.
कवठाची जेली
साहित्य
चांगले पिकलेले कवठ, साखर पाणी.
कृती
कवठाचा गर दुप्पट पाणी घालून उकळावा. गार झाल्यावर कोळून गाळण्याने गाळून घ्यावा. त्यात गराच्या सव्वापट साखर घालून पाक करावा. 2 तारी पाक झाला की ताटाला थोडेसे तेल लावून त्यात तो ओतावा. सेट होऊ द्यावे. गार झाल्यावर सुरीने शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कराव्यात. हातात घेतल्यावर थोड्याशा लिबलिबीत पण पारदर्शक फिक्या ब्राऊन चवीलाही आंबडगोड अशा होतात. हवे तर चॉकलेट प्रमाणे छोट्या पॉलिथिन रॅपरमध्ये गुंडाळाव्यात. खाऊ म्हणून मुलांना द्यायला हरकत नाही.
कवठाची बर्फी
साहित्य –
चांगले पिकलेले कवठ, गराच्या दीडपट साखर, शेंगदाण्याचे कुट, गराइतकेच अर्धी वाटी पीठीसाखर, 4-5 वेलदोड्यांची पूड, 1 चमचा तूप.
कृती –
कवठाचा गर काढून त्यातले दोरे काढावे. वाटीभर गर असल्यास दीड वाटी साखर घालून कढईत मंद शिजवावे. साखर विरघळून घट्ट व्हायला लागल्यावर शेंगदाण्याचे कुट त्यात मिसळावे. कडेने चमचाभर तूप सोडावे. थालीच्या तुपाचा हात लावावा. वाटीच्या बुडालाही बाहेरुन तूप लावावे. मिश्रण घट्ट झाल्यावर पीठीसाखर व वेलची पूड घालून हलवून गरमागरमच थाळीत ओतून वाटीने थापून पसरवावे. थोडे गार झाल्यावर सुरीने वड्या कापाव्यात. ह्या वड्या उपासाला चालतात. विशेषतः शिवरात्रीला करतात.
टीप – शेंगदाणा कुटाऐवजी ओले खोबरे घालूनही करतात.
बेरीचे लाड
साहित्य –
तूप कढवून गाळल्यावर उरलेली बेरी 1 वाटी, 2 चमचे तवकील, 2 चमचे साबुदाणा पीठ, 2-3 वेलदोड्याची पूड, पीठीसाखर 1 वाटी.
कृती
तूप कढवल्यावर खाली उरणारी बेरी थोडी खरपूस करुन घ्यावी. मिक्सरच्या भांड्यात बारीक करुन घ्यावी. मग तवकील साबुदाणा पीठ, वेलची पूड घालून पुन्हा एकदा मिक्सरमधुन फिरवून एकजीव करुन घ्यावे. प्लॅस्टीकच्या अर्धगोळाकृती चमच्याने त्याच्या मुदी पाडाव्यात. इग्लूसारखे दिसणारे हे लाडू खूपच छान लागतात. किंचित आंबडगोड चव व फिक्कट चॉकलेटी गुलाबी रंगाचे हे लाडू बद्धकोष्ट व मेसेस कमी होण्यासाठीही उपयुक्त तर आहेतच. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम. खुप दिवस टिकतात..
Leave a Reply