साहित्य: २०० ग्राम पनीर, मोठे चौकोनी तुकडे, १ मध्यम भोपळी मिरची, मध्यम चौकोनी तुकडे, १ लहान कांदा, मध्यम चौकोनी तुकडे (प्रत्येक पाकळी विलग करावी.)
पुदिना चटणी: १/४ कप पुदिन्याची पाने, २ टेस्पून कोथिंबीर, १ टीस्पून कॉर्न फ्लोअर, ५ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून धणेपूड, १/२ टीस्पून जिरेपूड, ४ ते ५ लसूण पाकळ्या, २ टेस्पून आंबट दही, चवीपुरते मीठ.
इतर साहित्य: २ टीस्पून तेल, थोडेसे मीठ, पनीर ग्रील केल्यावर भुरभुरायला १ टीस्पून चाट मसाला + १/२ टीस्पून तंदूर मसाला, २ ते ३ चिमटी मिरपूड, २ ते ३ चिमटी लाल तिखट पावडर.
कृती: पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, धने-जिरेपूड, लसूण, दही आणि मीठ एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. घट्टसर पेस्ट बनवावी. त्यात कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे. पनीर, भोपळी मिरची, आणि कांदा एकत्र करून पुदिन्याच्या पेस्टमध्ये मॅरीनेट करावे. जर मेटल स्क्युअर्स असतील तर त्यावर भाज्या आणि पनीर ओवून घ्यावे. १ तास फ्रीजमध्ये ठेवावे. तंदूर ३-४ मिनिटे प्रीहीट करावा. पनीर आणि भाज्यांवर तेल स्प्रे करून घ्यावे. नंतर स्क्युअर्स तंदूरमध्ये ठेवून कडा ब्राउन होईस्तोवर ग्रील करावे. बाहेर काढून थोडे पातळ केलेले बटर ब्रश करावे. त्यावर चाट मसाला, तंदूर मसाला, मिरपूड, लाल तिखट आणि थोडे मीठ घालून सर्व्ह करावे. हे अपेटायझर नुसतेच छान लागते. वाटलेच तर बरोबर पातळ उभा चिरलेला कांदा, त्यावर लिंबू पिळून आणि थोडे मीठ घालून सर्व्ह करावे.
Leave a Reply