टारली माशाचे तिक आंबट

फिश करी बनवणं तसं फार किचकट काम..
कोकण, कारवार किंवा गोव्यात बनणाऱ्या फिश करीजची लज्जत काही औरच असते. ती चव, आपल्याला घरातील फिश करी मध्ये सहसा मिळत नाही. कारण, फिश करी साठी मसाला घेताना आपल्या कडून काही मात्रा चुकत असतात. मसाल्याचं हवं तेवढं आणि योग्य प्रमाण नसणं, हे त्याचं प्रमुख कारण आहे.
पण आजच्याला, मी तुम्हाला एक खूपच सोप्पी फिश करीची रेसिपी शिकवणार आहे.
ती सुद्धा.. एका किचकट माशाची.

सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीला आवडणारा मासा म्हणजे..
पापलेट, हलवा किंवा सुरमई.. कारण या माशात जास्ती काटे नसतात. पण खरं तर, ज्या माशात जास्ती काटे असतात. तेच मासे चवीला खूप छान असतात. काटेरी मासे, मसाल्यामध्ये उकळत असताना. ज्यावेळी, माशाचा अंगचा रस्सा त्या मसाल्यात मिक्स होतो. त्यावेळी, एका विशिष्ट स्वादाची झलक आपल्याला नासिकांना अनुभवायला मिळते. आणि ती चव चाखताना आपली जिव्हा सुद्धा तृप्त होते. चला तर मग, या फिश रेसिपीला आपण सुरवात करूयात.

टारली माशाचे तिक आंबट बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहेत. अर्धा किलो टारली मासे, हळद, मीठ, लाल तिखट, कोकम, कोथिंबीर आणि तिरफळ. या रेसिपीला तेलाची आवश्यकता नाहीये बरं का.
टारली मासा.. शक्यतो दुकानात घेत असतानाच चांगला साफ करून घ्यावा. दुकानदार साफ करून देत नसतील, तर जास्तीचे दोन पैसे द्यावे. पण शक्यतो हे किचकट काम दुकानातुच करून घ्यावं. नंतर घरी आल्यावर.. त्या, माशांना दोन तीन पाण्यात हळुवार धुवून घ्यावं. आणि, मीठ लाऊन बाजूला मुरत ठेवून द्यावं.

आता आपण मसाला करायला सुरवात करूयात.. या फिश करीसाठी अगदी सोपा असा मसाला बनवण्याची पद्धत आहे. किंबहुना याला मसाला सुद्धा म्हणता येणार नाही.
ज्या पातेल्यात ( जर्मलच्या ) आपण हि फिश करी बनवणार आहोत. त्याच भांड्यामध्ये. दोन मोठे चमचे तिखट घ्यावं, त्यात एक लहान चमचा हळद घालावी. आणि त्यामध्ये दहा बारा कोकमाची सालं घ्यावीत. माशाला मीठ लावलं असल्याने, इथे मीठ जरा बेतानेच घालावं. अर्धा ग्लासभर पाणी घालून हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. आणि हे मिश्रण मंद आचेवर उकळत ठेवावं. आणि सर्वात शेवटी, दहा पंधरा तिरफळातल्या काळ्या बिया काढून त्याला खलबत्त्यात ठेचून घेऊन या मिश्रणात घालावं. ओले तिरफळ मिळाले तर अगदी सोनेपे सुहागाच. तिरफळ ठेचल्यामुळे तिरफळाचा एक वेगळाच स्वाद आपल्याला या करीमध्ये मिळतो.

दहा पंधरा मिनिटांत, या मिश्रणाला चांगली उकळी येते. उकळी आल्यावर, हळुवारपणे एक एक मासा त्यात सोडावा. त्यानंतर.. एका पळीने, उकळी आलेला रस्सा त्या माशांवर पसरवावा. हि करी बनवत असताना, माशांना पळीने किंवा उलतन्याने बिलकुल ढवळू नये. असं केल्याने माशांचा गाळ होऊ शकतो. माशांवर रस्सा सोडून झाल्यावर, पातेल्याच्या किनारीला कपडा लाऊन हाताने किंवा पकडीने धरून, गोल गोल फिरवून आणि वर खाली करून घ्यावं. म्हणजे सगळा मसाला आणि आंबट माशांच्या अंगाला लागेल. नंतर.. दहाएक मिनिटं, त्याला झाकण लाऊन मंद आचेवर शिजू द्यावं. टारली मासे शिजायला जास्ती वेळ लागत नाही. एका वाफेवर मासे चटकन शिजून जातात. करी तयार झाल्यावर वरून थोडी चिरलेली कोथिंबीर पेरावी.

अंगभर रस्स्यात तयार झालेली हि फिश करी, गरमागरम वाफाळलेल्या पांढऱ्या शुभ्र भातासोबत खायला द्यावी. आंबट आणि तिखट चवीचा हा लाजवाब रस्सा खूपच स्वादिष्ट लागतो.
जेवण करताना, काही मिनिटांतच तुम्हाला या स्वर्गीय चवीची गोडी प्राप्त होईल. परंतु, हे टारली मासे खाताना थोडी सावधानता बाळगावी. या माशात खूप बारीक बारीक काटे असतात. त्यांना व्यवस्थितपणे चावून खावं. किंवा हाताने चाचपून काढून तरी टाकावं.
नाहीतर.. ते काटे, या स्वर्गीय चवीच्या फिश करीला बेचव करण्याची एकही संधी दवडणार नाहीत.

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*